Take a fresh look at your lifestyle.

खेळ अजब.. होणार गजब.. कडक दंगा! १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय ‘झिम्मा’; पहा ट्रेलर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या जगात एकच गोष्ट अशी आहे जी ओळखणं सोप्प नाही. ती म्हणजे, बायकांच्या मनात काय सुरु आहे, त्या कधी कशा व्यक्त होतील. काय पटलं ना? अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात आणि मनसोक्त जगायचं प्रयत्न करतात तेव्हा जी धमाल होते, तीच धम्माल मराठमोळ्या आगामी ‘झिम्मा’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. झिम्मा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा ‘झिम्मा’ हा मराठीतील पहिला बिग बजेट सिनेमा असणार आहे. त्यामुळे मराठी सिनेप्रेक्षकांना आता लवकरच सिनेमागृहात जाऊन झिम्माच्या खेळात सहभागी होता येणार आहे. हा सिनेमा १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इंग्लंडला फिरायला निघालेल्या सात वेगवेगळ्या स्त्रियांचा हा प्रवास अतिशय रंजक असून थोडा भावनिक तर थोडा हटके आहे. या चित्रपटात दंगा करणाऱ्या या सात महिला म्हणून सुहास जोशी, निर्मिती सावंत, सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले दिसतील. तर सहाय्यक भूमिकांमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे दिसतील.

चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेनेच केले आहे तर कथा इरावती कर्णिक यांची आहे. शिवाय चित्रपटातील गाण्याचे संगीत अमितराज याने दिलेले आहे. या चित्रपटाचे मुख्य गाणे ‘होऊन जाऊ दे पुन्हा गं आता जोरात! जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात! खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा गं’ हे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर आणि सुहास जोशी यांनी गायले आहे.

या चित्रपटात इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसणाऱ्या पण मनातून सगळ्या टोट्टल सेम असणाऱ्या या स्त्रियांचा हा एक अनोखा प्रवास यात पाहायला मिळेल. या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर सिद्धार्थ चांदेकर घडवून जाणार आहे. ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक, धमाल, मस्ती, मजा देणारे आणि मनोरंजनाचे एक फुल्ल पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे.