Take a fresh look at your lifestyle.

‘जजमेंटल है क्या’ फेम अभिनेता ललित बहल यांचे वयाच्या ७१व्या वर्षी कोरोनामुळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढतच चालले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाट तितकीच भयानक आहे. दरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे संकट सिनेसृष्टीवर देखील बळावलेले दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर येत आहे. आता यात आणखी एका मोठा धक्का बॉलीवूडला पचवावा लागतोय. अभिनेता ललित बहल यांचेही कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे.

ललित बहल यांना आठवड्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र २३ एप्रिल २०२१ रोजी शुक्रवारी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. ललित यांनी तितली आणि मुक्ती भवन यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा मुलगा दिग्दर्शक कानू बहल यांनी त्यांच्या निधनाविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘ललित यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना हृदयाच्या समस्या होत्या. त्यात फुफ्फुसामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत होता. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय गंभीर झाली होती. त्यानंतर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ७१ वर्षांचे होते.’

 

ललित बहल यांनी अफसाने या मालिकेद्वारे त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनी अभिनयासोबत तपिश, आतिश यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली होती. मेड इन हेवन या वेबसिरिजमध्येदेखील त्यांनी उत्तम दर्जाची भूमिका साकारली होती. तर ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरावर चांगलेच कौतुक झाले होते.