पंगा गर्लचा अग्नी अवतार चर्चेत; ‘धाकड’च्या ट्रेलरची सोशल मीडियावर हवा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीत पंगा गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून ती विविध वादग्रस्त वक्तव्ये, टीका टिप्पणी यांसह तिच्या ओटीटी शो लॉक अपमुळे चर्चेत होती. तर आता तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘धाकड’ असे आहे. या चित्रपटातील कंगनाची भूमिका काहीशी वेगळी आणि हटके दिसून येतेय. तर ट्रेलरमधील तिचा अवतार पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच विविध हटके भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज असते. ती नेहमीच आपल्या भूमिकांसाठी १००% टक्के योगदान देते. त्यामुळे आगामी चित्रपट ‘धाकड’ मधील आव्हानात्मक भूमिका साकारताना तिने मागे पुढे काहीही विचार केलेला नाही . तर थेट भूमिकेला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली मेहनत या ट्रेलरमधून दिसून येतेय. नुकताच कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये फुल्ल ऑन ‘अॅक्शन आहे, हटके स्टाईल आहे आणि इंटरटेन्मेंटचा जोरदार धमाका आहे’ त्यामुळे हा चित्रपट नुसत्या ट्रेलरनेच प्रेक्षकांना ओढताना दिसतोय.
‘धाकड’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ‘एजंट अग्नि’च्या भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच वेगळ्या भूमिकेतून आणि वेगळ्या लूकमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे जणू कंगनाचा छंद आहे. यावेळी तिने एकाच चित्रपटात तब्बल सात वेगवेगळे लूक आणि अनेक कॉम्बेट सीन्स दिले आहेत. जे पाहून प्रेक्षक वर्ग पूर्णपणे थक्क होऊन जाईल. या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता अर्जुन रामपालदेखील दिसणार आहे. तर कंगना आणि अर्जुनचा हा ‘धाकड’ चित्रपट येत्या २० मे २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांचे डिझाईन आणि कोरियोग्राफी केलेला सिनेमा आहे. या चित्रपटासाठी कंगनाने फाईट सीनदेखील दिले आहेत.