Take a fresh look at your lifestyle.

प्रेग्नेंसी बुकमुळे करीना कपूर खान अडचणीत; अल्फा ख्रिश्चन महासंघाकडून पोलिसांत तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान हिच्या विरोधात बुधवारी बीड येथे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. करिना कपूर खान हिने तिच्या दोन्ही गर्भावस्थेतील अनुभव शेअर करणारे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला तिने करिना कपूर-खान्स प्रेग्नंसी बायबल असे नाव दिले आहे. करिना कपूरने तिच्या प्रेग्नेंसी अनुभवांवर लिहिलेल्या या पुस्तकासाठी पवित्र बायबलचे नाव वापरल्याने तिच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या नावावर आक्षेप घेणाऱ्या अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाकडून करिनाविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

करिना कपूर खानच्या या पुस्तकाच्या नावाचा विरोध करीत बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात तातडीने गुन्ह्याची नोंद व्हावी अशी मागणी देखील या संघातर्फे वारंवार करण्यात येत आहे. अभिनेत्री करीना कपूर ही काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली.

तिने पुन्हा एकदा एका मुलास जन्म देत आई होण्याची अनुभूती मिळवली. यानंतर अगदी काहीच दिवसांत तिचे गर्भारपणावर लिहिलेले हे पुस्तक प्रकाशित झाले. करिनाने या पुस्तकात आपल्या गर्भारपणातील स्वत: अनुभवलेल्या सर्व बाबींविषयी माहिती दिली आहे. या पुस्तकाबाबत करिनाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितले होते. दरम्यान तिने हे पुस्तक म्हणजे माझं तिसरं मुलं असेही म्हटले होते.

करिना कपूरने तिच्या दोन्ही प्रेग्नंसी काळातील अनुभवांवर आधारलेले ‘Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible’ नावाचे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकाच्या नावावरून आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. याआधी अलीकडेच ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेतला असल्याचे समोर आले होते. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्ड अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी कानपूरमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत करीनाच्या पुस्तकाचा सवांकडून विरोध करण्यात आला. शिवाय पुस्तकाचे नाव ‘प्रेग्नंसी बायबल’ ठेवल्याबद्दल अभिनेत्री करिना कपूर खानचा कडक शब्दांत निषेधही करण्यात आला होता.