Take a fresh look at your lifestyle.

‘कसौटी..’ मालिकेतील सुब्रको उर्फ प्राचीन चौहानला अटक; तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी नागिन फेम अभिनेता पर्ल वी पुरी याला एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी पॉस्को कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. यानंतर आता आणखी एका मालिका जगतातील प्रसिद्ध अभिनेत्याला एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा कलाकार कसौटी जिंदगी कि या अत्यंत लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांच्या ओळखीचा व लाडका चेहरा आहे. अभिनेता प्राचीन चौहान असे याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांनी कारवाई करीत त्यास अटक केल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता प्राचीन चौहान याला एका तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई मुंबईतील मालाड पूर्व पोलिसांकडून करण्यात आली असून मीडिया रिपोर्टनुसार, पीडित तरूणीने तक्रार केल्यानंतर प्राचीनच्या विरोधात पोलिसांनी आयपीसी कलम ३५४, ३४२, ३२३ आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेतुन अभिनेता प्राचीन चौहान याने टीव्ही जगतात पदार्पण केले होते. या मालिकेदरम्यान त्याला अत्यंत प्रसिद्धी मिळाली होती. मुख्य म्हणजे प्राचीनदेखील पर्ल पुरी प्रमाणेच एकता कपूरच्या प्रोडक्शनशी जोडलेला कलाकार आहे.

अभिनेता प्राचीन चौहान याने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात करून प्रेक्षकांच्या मनात आपले असे स्थान निर्माण केले होते. या मालिकेत त्याने सुब्रको बसू ही भूमिका केली होती. हि भूमिका लोकांना अतिशय भावली होती. त्यानंतर तो ‘कुछ झुकी पलकें’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘सात फेरे’ आणि ‘माता पिता के चरणों में स्वर्ग’ अशा मालिकांमध्ये झळकला होता. दरम्यान आता सध्या तो यूट्यूबवरील प्रसिद्ध वेब शो ‘शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग'(SIT) मध्ये छवी मित्तल आणि पूजा गौरके यांसह तो काम करताना दिसतोय.