Take a fresh look at your lifestyle.

अंकुश चौधरी ते शाहीर साबळे.. छोटी व्हिडीओ मोठी गोष्ट; केदार शिंदेंची व्हिडिओ पोस्ट व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आगामी मराठी चित्रपट महाराष्ट्राचे शाहीर चांगलाच चर्चेत आहे. मराठी अभिनेता अंकुश चौधरी हा या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिरांच नुसतं नाव ऐकलं तरीही डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते त्या प्रतिमेने महाराष्ट्राच्या कलेचा वारसा जपलाय. दरम्यान ते हयात नसले तरीही त्यांची कला जिवंत राहण्यासाठी त्यांचा नातू आणि आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे आजही कार्यरत आहे. आता तर केदार त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करतोय ज्यात अंकुशने त्यांची भूमिका साकारली आहे. हि भूमिका साकारताना एक वेगळं दडपण होतच. पण शाहीर साकारायचे होतेच यासाठी त्याने काय आणि कशी मेहनत घेतली याची एक छोटीशी झलक दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण अंकुशचा हा खास लुक कसा तयार झाला याचा हा व्हिडीओ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर केलाय. या व्हिडिओला हटके कॅप्शन देत केदार शिंदे म्हणाले कि, ‘चरित्रपट बनवताना कलाकाराने त्या व्यक्तीसारखं दिसणं खूप महत्त्वाचं असतं, ज्याच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. अंकुशला शाहिरांसारखं दाखवण्यासाठी विक्रम गायकवाडांची संपूर्ण टीम, त्यातही महत्त्वाचं म्हणजे जगदीश येरे यांनी खूप मेहनत घेतली. युगेशा ओमकारने वेशभूषेची बाजू सांभाळली. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट होती शाहिरांचा आत्मा अंकुशमध्ये आणि त्या पोस्टरवरच्या एका फोटोमध्ये उतरवणं. मेकअप, वेशभूषा हुबेहूब होऊ शकते पण जोवर कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडत नाही तोवर योग्य परिणाम साधता येत नाही. हा परिणाम पोस्टरमधे साधण्यासाठी केलेले पडद्यामागचे प्रयत्न आज शेअर करतोय.’

शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं आहे. त्यामुळे त्यांचं महाराष्ट्र गीत असो किंवा मग खंडोबाचा जागर ते प्रत्येक गाणं मराठी मनावर कोरल आहे. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आजही स्मरणात असेलच यात काही वाद नाही. त्यामुळे शाहीर साबळे कोण होते आणि त्यांनी काय केलं हे आजच्याही पिढीला माहित असणे गरजेचे आहे यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केले असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाची पटकथा, संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना अजय- अतुल यांचे संगीत लाभणार आहे.