Take a fresh look at your lifestyle.

नो टेन्शन, फुल्ल टशन; केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ 28 जानेवारीपासून चित्रपटगृहात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र मनोरंजनाची दिवाळी सुरु आहे. कारण राज्यभरातील चित्रपटगृहे सुरु झाली असून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रत्येकासाठी चित्रपटगृहे ५०% क्षमतेने खुली करण्यात आली आहेत. यामुळे यंदाची दिवाळी मनोरंजनाची दिवाळी झाल्यानंतर एकापेक्षा एक अव्वल अश्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली आहे. बघता बघता वर्ष सुरू लागले असून आता अगदी अखेरचा एकच महिना आणि २०२२ उगवेल कळणार सुद्धा नाही. पण म्हणून मनोरंजन थांबणार नाही. कारण केदार शिंदे येत्या नव्या वर्षात आपल्यासाठी नवाकोरा धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे बाईपण भारी देवा.

मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात अव्वल दर्जाचे काम करीत आपल्या नावाची एक विशेष ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा चित्रपट येणार म्हटलं कि प्रेक्षकवर्गही खुश असतो. कारण केदार यांच्या चित्रपटात थोडं प्रेम असत, विविध भावना, एक गुपित, रोमांचक कथा आणि फुल्ल ऑन एंटरटेनमेंट समाविष्ट असते. यामुळे येत्या वर्षातील हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे. केदार शिंदे यांची आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करीत आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. त्यांनी हि पोस्ट शेअर करताना एक पोस्टर आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा’ – 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!

यामुळे केदार शिंदे त्यांच्या चाहत्यांना नव्या वर्षामध्ये ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाची ट्रीट देणार आणि मनोरंजनाचा धमाका होणार हे नक्की. नव्या वर्षात म्हणजेच २८ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट राज्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. माहितीनुसार या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने , सुचित्रा बांदेकर, दीपा परब , शिल्पा नवलकर या भारी महिला मंडळी आहेत. ज्या करतील कल्ला, घालतील गोंधळ, मारतील उड्या, उडवतील दांड्या पण मनोरंजनाच पक्का वायदा. अद्याप या चित्रपटाची कथा काय असेल? कशी असेल? हे अजूनतरी गुलदस्त्यात आहे. पण एकंदरच चित्रपटाचे नाव आणि पोस्टर ऐकून हि कथा बाईच्या बाईपणावर आधारलेली आहे हे स्पष्ट होत आहे.