Take a fresh look at your lifestyle.

‘तुकाराम महाराजांची बायको खरंच कजाग होती का..?; लेकीच्या प्रश्नावर मानेंनी दिलं ‘हे’ उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संतांची शिकवण आणि महाराजांचा वारसा केवळ मनात बाळगणारे नव्हे तर आचरणात आणणारे अनेक लोक आहेत. पण काही कलाकार मित्रांची बातच और आहे. अश्यांपैकी एक म्हणजे किरण माने. किरण माने नेहमीच फेसबुक पोस्टमुळे चर्चेत असतात. पण यावेळी ते लाडक्या लेकीच्या प्रश्नामुळे चर्चेत आहेत. किरण मानेंची लेक इशा हिने अलीकडेच एका नाटिकेत तुकाराम महाराजांची पत्नी आवलीचे पात्र साकारले. यानंतर तिच्या मनात अवली खरचं कजाग होत्या का..? असा प्रश्न निर्माण झाला आणि तिने तो बाबाना विचारला. यावर उत्तर देताना किरण मानेंनी असाच प्रश्न प्रत्येकासाठी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचे सारासार उत्तर दिले आहे.

किरण मानेंनी लिहिले कि, “बाबा, तुकाराम महाराजांची बायको खरंच खूप कजाग होती का हो?” मला दोन मिन्टं कसं सांगावं ते कळंना… म्हन्लं, “कजाग नव्हती… तिची चिडचिड व्हायची. नवर्‍यानं ज्या व्यवस्थेविरोधात बंड पुकारलं होतं, ती लोकं किती कुटिल कारस्थानी आहेत हे तिला माहिती होतं. नवर्‍यानं सरळ चारचौघांसारखा संसार करावा, हे त्याकाळातल्या कुनाबी बाईला वाटनं साहजिकय. त्यांनी संसार उधळून दिला नव्हता, पन समाजकार्यामुळं संसार मोडकळीला आला होता. कधीकधी हे सहन न होऊन ती मनातली भडास काढत आसंल, कडाकडा भांडत आसंल… पन त्याचवेळी आपला नवरा किती महान हाय हे त्या माऊलीला आतनं माहीत होतं. तिचं अमाप प्रेम होतं त्यांच्यावर. मला सांग, घरापास्नं दूर मनन चिंतन करत, अभंग लिहीत बसलेल्या आपल्या नवर्‍याला भुक लागली आसंल म्हनून, भांबनाथाच्या नायतर भंडार्‍याच्या डोंगरावर भाकरी घिवून जायचं.. ते बी अनवानी पायानं… पायात काटंकुटं मोडायचं, डोक्यावर तळपनारं ऊन असायचं… हे ‘प्रेम’ असल्याशिवाय शक्य हाय का गं?”

ईशा शांतपने ऐकत होती. म्हन्लं,”तुकारामांच्या बायकोचं खरं नांव काय होतं सांग?” ..ती म्हन्ली “जिजाई” …त्या काळात महाराज लाडानं तिला ‘आवली’ म्हनायचे.. हे प्रेम नाहीतर काय??” ईशा हसली. म्हन्लं, “अगं ते मनापासुन संसार करत होते आवलीसोबत. सुखानं. त्यांना पाच मुलं झाली. तुकोबाराया गेले तेव्हा आवली ६ महिन्यांची गरोदर होती. त्यांच्या पश्चात ३ महिन्यांनी त्यांना सहावा मुलगा झाला…आता पुढचं महत्त्वाचं ऐक. त्या सहाव्या मुलाचं नांव नारायण. नारायण आपल्या बापासारखा व्हावा, या इच्छेपोटी आवलीनं त्याला वारकरी पंथाची शिकवण दिली ! जगद्गुरू तुकोबारायांनंतर वारकरी पंथाची पताका मोरे घरान्यात कुनी खांद्यावर घेतली आसंल तर ती नारायण महाराजांनी !! एवढंच नाही तर ‘ग्यानबा-तुकाराम’ हा गजर नारायण महाराजांनी लिहीला आणि सुरू केला !!! माऊली – तुकोबांची संयुक्त पालखीही त्यांनीच सुरू केली.. हे सगळं का केलं?? तर आईची – तुकोबांच्या आवलीची इच्छा होती, की आपल्या मुलानं बापाच्या पावलावर पाऊल ठेवावं… आता मला सांग ती नवर्‍यावर वैतागलेली, कजाग असेल का गं?”

ईशा रडत होती. मी म्हन्लं, “आज मी खूप आनंदी आहे की तू आवलीची भुमिका करणार आहेस. प्रयोगाला येऊ शकत नाही, पन तू मनापास्नं कर. माझी आवली रागीट होती, भांडकुदळ होती पन आत प्रेमाचा झरा होता तो विसरू नकोस !” ईशानं काल आवली सादर केली. मी बोलून दाखवलं नाय, पन मला लै लै लै भरून आलं होतं. ईशा तुकोबामय तर झाली होतीच, तिच्यासोबत रखुमाई करणारी अनुष्का आपटेही विठ्ठलमय झाली होती असं ऐकलं. ईशानं अभिनय क्षेत्रात जायचा निर्णय घेतल्यावर, माझ्या बेफिकीर वृत्तीमुळं होणारा सगळा त्रास सहन करुनही तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी माझी बायकोही आज मला नव्यानं उमगू लागलीय…- किरण माने.