Take a fresh look at your lifestyle.

ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे..; केतकी चितळेच्या कृत्यावर किरण माने संतापले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे नेहमीच त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत राहिले आहेत. एखाद्या विषयावर अत्यंत परखड आणि भेदक वक्तव्य करणे असो किंवा कोणत्याही मुद्द्यावर बेधडक लिहिणे असो दोन्हीमध्ये माने चपळ आहेत. शनिवारी केतकी चितळेला शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवल्यानंतर सर्वत्र तिच्या पोस्टचा आणि तिचा निषेध केला जातोय. अशातच आता किरण माने यांनीही आपला संताप आणि खंत व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे जी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे हि पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छीतो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की ‘लेडीज कार्ड’ खेळून ‘गैरवर्तना’चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा ‘गट’ जमवला..हळूहळू कुरबूरी सुरू केल्या.. आणि… असो. बात निकलेगी तो दूSर तलक जायेगी. अशा विकृतांच्या अनेक हिडीस घटना, बेताल-बिभत्स वागणे आमच्या अख्ख्या युनिटने पाहिलेले आहे. पण अशा गोष्टी उघड करून कुणा भगिनीच्या चारीत्र्यावर चिखलफेक करणं ही आपली संस्कृती नाही. पण त्याचवेळी केवळ आपल्या विरोधी विचारसरणीचे आहेत म्हणून, नेत्यांपासून महामानवांबद्दल त्यांनी केलेले अर्वाच्य, घृणास्पद बोलणे सहन नाही करू शकत.

…असह्य होऊन आपण बंड करून उठलो, तर त्याच अभिनेत्री नंतर पुरोगामी विचारांच्या नेत्यांचे, खासदारांचे कान भरून ‘उलट्या बोंबा’ कशा मारतात आणि आपले नेते त्यांची बाजू कशी घेतात, ते ही मी ‘याची देही याची डोळा ‘ पाहीलेय. मी भक्कम आहे. कुणाचा मिंधा नाही. पोटासाठी लाचार होणारा नाही. म्हणून पुरून उरलोय या विकृतांना. बाकी कलाकारांची काय घुसमट होत असेल कोण जाणे. सविस्तर लिहीणार आहे योग्य वेळी. आधी कुजबूज स्वरूपात अशा वल्गना चालायच्या…गेल्या पाचसहा वर्षांत सेटवर मोठ्या आवाजात उघडपणे सुरू झाल्या.. आता पोस्ट करण्यापर्यन्त मजल गेली ! त्यामुळे ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे. असो. आज छ. संभाजी महाराज जयंती ! ‘बुधभूषण’ या ग्रंथात छ. संभाजी महाराज म्हणतात, “आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घरातला पुरूष घरात नसेल, तर त्या घराचा उंबराही ओलांडू नये.”

..याला म्हणतात संस्कार ! तरीही मनूवाद्यांनी शंभूराजांना महिलांविषयी वर्तनाचे खोटे आरोप ठेवून बदनाम केले.. पण काळाच्या ओघात वर्चस्ववाद्यांचे कारस्थान भेदून राजेंचे स्वच्छ, नितळ, निर्मळ चारीत्र्य लखलखून वर आले. स्वत: सततच्या लढायांमध्ये गुंतलेले असताना शंभूराजेंनी रायगडाचा मुलकी व्यवहार महाराणी येसूबाईंच्या हाती सोपवला होता. महिलेला पंतप्रधानपद देणारा पहिला राज्यकर्ता ! एवढेच नव्हे, तर त्यांनी येसूबाईंची मुद्रा चलनी नाण्यावर छापली होती.. साडेतीनशे वर्षांपूर्वी महिलेला हा सन्मान देणार्‍या महापराक्रमी महापुत्राला विनम्र अभिवादन !!!
– किरण माने.