Take a fresh look at your lifestyle.

‘एकीकडे अमिताभ, तर दुसरीकडे फुटपाथवरली पोरं’; किशोर कदम यांची पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन स्टारर झुंड आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासह या चित्रपटात अनेक अवली कलाकार आहेत. त्यांपैकी एक म्हणजे किशोर कदम. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी आजही अनेक जण प्रतीक्षेत आहेत. पण आपल्या नशिबी हा योग आला आणि दरम्यान त्यांनी काय अनुभवले हे त्यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितले आहे.

किशोर कदम यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट करताना लिहिले कि, यातल्या तिसऱ्या फोटो फ्रेममध्ये अमिताभ बच्चन हा एकच माणूस तुम्हाला दिसत असेल. मलाही तोच दिसतो आहे. तो असेल त्या फ्रेममध्ये आजवर खरं सांगतो कुणीही आणि कितीही माणसं असली तरी मला तोच दिसत आलाय. इतका तो माणूस माझ्या मनाच्या पडद्यावर मोठ्ठा कोरला गेलाय. आजवर मी त्याला दोनदा भेटलो आहे. पहिल्यांदा आयबीएन लोकमत पुरस्कार मिळाला होता तेव्हा आणि आता नागराजच्या ” झुंड” च्या सेटवर सतत दहा दिवस. तेव्हाही मी एक फोटो काढला होता त्यासोबत पण नंतर मी तो कधी पाहिलाच नाही कारण त्यातही मला फक्त तोच दिसत होता.
“अमिताभ बोल्तो का रे सेटवर?”
“कॅाम्प्लेक्स येतो का रे त्याचा ?”
“समोरच्याला घाबरवत असेल ना तो ?”
“काय बोल्लास त्याच्या बरोबर “ असे अनेक प्रश्न कुणी कुणी विचारतात .. आणि त्यांना काय उत्तर द्यावं कळत नाही. जिथे त्या माणसा सोबत एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो. त्या माणसाबद्दल असल्या प्रश्नांना उत्तरं देत बसणं मला फिजूल वाटतं. नागराजमुळे मला या महान माणसासोबत काम करता आलं हे नागराजचे उपकारच. काल “झुंड” पाहिला आणि हा माणुस किती ग्रेट ॲक्टर आहे हे पुन्हा एकदा कळलं. आपलं सगळं स्टारडम, ॲंग्री मॅनची प्रतिमा आणि लोकांनी दिलेलं देवत्व विसरून एका साध्या फुटबॅाल प्रशिक्षकाची भूमिका ज्या ग्रेसफुली हा माणूस करतो त्याला तोड नाही. नागराजसारख्या तीनेक चित्रपटांचा अनुभव असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा निर्णय हा माणुस घेतो तेव्हा नागराजमधलं इनबॅार्न टॅलेंन्ट कळण्याची क्षमता वर्षानुवर्षांचा अनुभव असलेल्या माणसालाच असू शकते हे आपल्याला कळतं.

पुढे लिहिले कि, नागराजचा “झुंड“ प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देऊ शकतो. एकीकडे अमिताभसारखा अनुभवी नट तर दुसरीकडे नागपूर परिसरातल्या झोपडपट्टी आणि फुटपाथवरली दहाबारा पोरं हे कॅाम्बिनेशन नागराजने “फॅंन्ड्री, सैराट, नाळ“नंतर पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवलं आहे. अगदी नव्या कोऱ्या आणि रॉ लोकांना घेऊन त्यांच्या कडुन अगदी नैसर्गिक कामं करून घेण्याची कळ नागराजला सापडलीय …त्या साताठ पोरांचं काम बघून नट म्हणून हताश वाटतं.. इतकं नैसर्गिक दरवेळी आपल्यालाही करता आलं पाहिजे असं वाटत राहतं. या चित्रपटाचं संगीत आणि गाणी हाही प्रचंड विषय होऊ शकतो. अजय- अतुलना सलाम. या चित्रपटाचा एकूण परिघ आणि नागराज स्टाईल मध्ये त्याची गोष्ट सांगण्याची हातोटी हे गणित आता जमून आलंय असं दिसतं.

पुढे, नागराजच्या गोष्टी सोबत भोवतालचा समाज, त्यातले प्रश्न , राजकारण हे त्याला लगडूनच येतं .. चित्रपट संपल्यावर एक आशा प्रत्येकाच्या मनांत उमलून येते. सरळ सरळ उपदेशाचे डोस न पाजता प्रेक्षकां सोबत चित्रपटातली पात्र आणि चित्रपट घर पर्यंत येतो.. विचार आपसुकच सुरू होतो … एक भान आल्यागत वाटतं .. या चित्रपटाचा एक छोटासा का होइना पण भाग होता आलं याचा आनंद आहेच पण जे काही आहे ते काम अमिताभ बच्चन या अॅारा सोबत , या हेलो सोबत करता आलं ही एक अविस्मरणीय बाब आयुष्यात जपून ठेवता येईल या बद्दल नागराज आणि संपूर्ण “ आटपाट “ टीमचा मी खूप खूप आभारी आहे.