भूमिका जिवंत करणारा नट म्हणजे प्रसाद ओक; ‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर कुशलची खास पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी म्हणजेच १३ मे २०२२ रोजी प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मवीर हा चित्रपट शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले नेते आनंदराव दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. हे फक्त नेते नव्हते तर लोकांसाठी लोकांमध्ये काम करणारे लोकनेते होते. आज ते हयात नसले तरीही त्यांचा आदरयुक्त धाक ठाण्यात कायम आहे. यामुळे ते कोण होते आणि काय होते हे आजच्या पिढीलाही माहित व्हावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटातील आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने साकारली आहे आणि अव्वल साकारली आहे. यासाठी अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. यानंतर आता कुशल बद्रिके यानेही प्रसादसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करताना कुशलने लिहिले कि, ”एखादा नट एखाद्या भूमिकेला ”न्याय” देतो, एखादा ती भूमिका “जगतो” पण एखादी भूमिका “जिवंत” करणारा नट म्हणजे “प्रसाद ओक”. “धर्मवीर” सिनेमा बघून आलो आणि पुन्हा एकदा प्रसाद दादाच्या कामाच्या प्रेमात पडलो, सिनेमा बघताना साक्षात “दिघे साहेबांचा” भास होत राहिला. दिघे साहेबांच काम एवढं मोठ आहे की आजही त्यांची प्रतिमा ठाणेकरांच्या देवघरात पुजली जाते. आता देवाला दोन तासात मांडता येत नाही येणारही नाही, पण सिनेमा संपताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. आज इतक्या वर्षानंतरही साहेब तुम्ही आमच्यात जिवंत आहात आणि आजही आम्ही तुमच्या संस्कारात आहोत. आणि कायम राहू. धर्मवीर आनंद दिघे साहेब thank you….!”
धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट केवळ चित्रपट नव्हे तर एका अग्निकुंडाची गाथा आहे. या चित्रपटात थरार आहे, अंगार आहे आणि मुख्य म्हणजे शिवसेनेचा वाघ आहे. अलीकडेच या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते.
त्यांनी चित्रपट पहिला पण शेवट पाहिला नाही. असे का केले..? हा प्रश्न उपस्थित होण्याआधीच त्यांनी उत्तर देत सांगितले कि, मी शेवटचा सिन पाहू शकलो नाही. कारण आनंद दिघे गेल्यानंतर व्यतीत झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत. त्यांचं जाणं आम्हाला कधीच मान्य नव्हतं आणि सोसणार नव्हतं असे सांगत ठाकरेंच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. सध्या हा चित्रपट बॉलिवूड चित्रपटांनाही जोरदार टक्कर देत मागे टाकताना दिसतोय. आतापर्यंत ९ कोटींचा कमाईचा आकडा चित्रपटाने पार केलाय.