Take a fresh look at your lifestyle.

मुड है पार्टीवाला, तो बजाओ गाना ‘लफडा झाला’; ‘झुंड’ चित्रपटातील दुसरे गाणे ट्रेंडिंगवर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होऊ घातला आहे. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर आणि पहिले गाणे इतके लोकप्रिय झाले आहे कि बस्स. यानंतर आता याच चित्रपटातील दुसरे भन्नाट गाणे रिलीज झाले असून या गाण्यानेदेखील सोशल मीडिया गाजवला आहे. ‘लफडा झाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं रिलीज झाल्यापासून अगदी ट्रेंडिंग आहे. युट्युबपासून ते फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सगळीकडे याच गाण्याची चर्चा आहे.

लफडा झाला या गाण्याचे बोल हे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. तर मराठमोळ्या लोकप्रिय अजय-अतुल या जोडीने लफडा झाला या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे. एकंदरच गाण्याची रचना, गाण्याचे बोल आणि रापचिक स्टाईल हि कुणालाही वेधणारी आहे. त्यात आजच्या तरुणांमध्ये अशाच गाण्यांचे क्रेझ असल्यामुळे हे गाणं सैराट मधील झिंगाट या गाण्याला तोडीची टक्कर देणार असे दिसत आहे. युट्युबवर पहाल तर कळेल लोकांनी आपली पसंती कशी आणि किती दर्शवली आहे.

याआधी ‘आया है झुंड’ हे गाणं याच चित्रपटातील असून रिलीज झाल्यांनतर चांगल लोकप्रिय झालं आणि आता लफडा झाला हिट होताना दिसत आहे. या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्ये खूप आधीपासूनच उत्सुकता आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंड या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे.