Take a fresh look at your lifestyle.

लता दीदी हेल्थ अपडेट: एक्सट्यूबेशन चाचणीनंतर प्रकृती सुधारण्याचे आंशिक संकेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची शान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या रुग्णालयात आहेत. त्यांना घरातील कर्मचाऱ्याच्या सानिध्यात आल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना न्यूमोनिआचीदेखील लागण झाल्याचे समजले. वयवर्षे ९२ असल्यामुळे त्यांची प्रकृती पाहता तातडीने मुंबईतील बरीच कँडी रुग्णालयात दीदींवर उपचार सुरु केले. यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून अद्याप त्या आयसीयूमध्येच उपचार घेत आहेत. दीदींचे जगभरातील चाहते दररोज त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असतात. याचेच फळ का काय? आज मिळलेल्या ताज्या माहितीनुसार, दीदींच्या प्रकृतीत आंशिक सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.

लता दीदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून लता दीदींच्या प्रकृतीची माहिती देण्यात आलेली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेले आहे कि, लता दीदी आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. आज सकाळी त्यांची एक्सट्यूबेशनची (तीव्र व्हेंटिलेटर बंद करून पाहिला) चाचणी करण्यात आली आहे. यानंतर सध्या त्यांची प्रकृती सुधारण्याची आंशिक चिन्हे दिसत आहेत. परंतु डॉ. प्रतित समदानी यांच्या मार्गदर्शनाखालील डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली आणखी काही दिवस त्या असतील. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो.

लता मंगेशकर या एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आजतागायत त्यांना हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे.