Take a fresh look at your lifestyle.

लता दीदी हेल्थ अपडेट; अजून काही काळ रुग्णालयातच ठेवावे लागेल – डॉ. प्रतीत समदानी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात असल्यामुळे यांच्या प्रकृतीविषयी त्यांचे चाहते काळजी करत आहेत. यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दररोज हेल्थ अपडेट देणे सुरु केल्यामुळे चाहत्यांना तात्पुरता दिलासा मिळत आहे. यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. लता दीदींना अजून काही काळ रुग्णालयातच ठेवावे लागेल, अशी माहिती मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी माध्यमांना दिली आहे. कारण लता दीदींची बारकाईने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली दीदी राहतील, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. याशिवाय त्यांची तब्येत पूर्वीसारखीच असून त्यांना भेटण्यासाठी कुणालाही परवानगी देऊ शकत नाही असे स्पष्ट डॉक्टरांनी सांगितले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लता दीदींना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली जवळपास एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे वारंवार चाहत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली जात आहे. दरम्यान लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत समदानी यांनी खुलासा करताना सांगितले कि, लता दीदींवर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय त्यांच्या आरोग्याची माहिती सार्वजनिक करू नये, अशी लता दीदींची इच्छा आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या लता दीदी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डी वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल आहेत. वॉर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. तूर्तास त्यांची तब्येत आधीपेक्षा सुधारत आहे.

लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आजतागायत त्यांना हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे.