Take a fresh look at your lifestyle.

अफवा नको.. प्रार्थना हव्या!; लता दीदींच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा होताच कुटुंबियांचे आवाहन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दीदींना कोरोना आणि न्युमोनियाची एकत्र लागण झाल्यामूळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांचे वय ९२ असल्यामुळे प्रकृतीच्या दृष्टिकोनातून त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केले आहे. मात्र तेव्हापासून जवळजवळ आठवड्याहून अधिक दिवस होऊन गेले त्या अजूनही आयसीयुतच आहेत. यानंतर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, दीदींच्या प्रकृतीमध्ये किरकोळ सुधारणा झाली असून अफवा नकोत तर प्रार्थना हव्यात असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

नुकतेच सोशल मीडिया ट्विटरवर लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये लता दीदींच्या तब्येतीविषयी अपडेट देण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे कि, लता दीदींच्या तब्येतीत किरकोळ सुधारणा झाली असून त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. कृपया त्रासदायक अफवा पसरवण्यापासून किंवा दीदींच्या प्रकृतीबद्दल यादृच्छिक संदेशांना बळी पडण्यापासून परावृत्त करा. धन्यवाद. या आधीही लता दीदींच्या प्रवक्त्या आणि कुटुंबियांकडून वारंवार असेच आवाहन केले जात आहे कि अफवा पसरवू नका, अफवांना बळी पडू नका. दीदींसाठी प्रार्थना करा. मात्र अनेक लोक चुकीच्या बातम्या पसरवून चाहत्यांची आणि कुटुंबीयांची धास्ती वाढवीत आहेत.

लता मंगेशकर दीदींच्या तब्येतीबाबत सातत्याने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबीय वेगळ्याच मनस्थितीतून जात होते. त्यात सोशल मीडियावर रोज नवनवे अपडेट समोर येत होते. मात्र व्हायरल मेसेजवर कसलाही विश्वास ठेऊ नका. त्यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल. त्यामुळे कृपया खोट्या बातम्या पसरवणे बंद करा, असं खुद्द लतादीदींच्या ट्विटरवरुन सांगितलं जात आहे म्हटल्यावर आता अफवांना आळा बसेल. तसेच ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रताह यांच्याकडून एक अपडेट समोर आली आहे. त्यांनी सांगितले कि, “लता दीदींची प्रकृती म्हणावी तितकी सुव्यवस्थित नसली तरीही स्थिर आहे. त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. त्यांना लवकर बरं करण्यासाठी आमची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. तुमच्याही प्रार्थनेची गरज आहे”