Take a fresh look at your lifestyle.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; उपचारार्थ ICU मध्ये दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. माहितीनूसार, लता दीदींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या ९२ वर्षांच्या असून तब्येतीच्या तक्रारींमुळे सतत त्रस्त असतात असे सांगण्यात येत आहे. या वृत्तास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुजोरा दिला आहे.

 

लता दीदींच्या प्रकृतीबाबत माहिती बाहेर येताच माध्यमे आणि त्यांचे चाहते सक्रिय झाले असून. जो तो त्यांच्या प्रकृतीसाठी आणि उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान गायिका लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, “त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांचे वय लक्षात घेता खबरदारीच्या कारणास्तव डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि दीदींना तुमच्या प्रार्थनेत ठेवा,”.

 

लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आजतागायत त्यांना हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे.