Take a fresh look at your lifestyle.

दिवंगत दाक्षिणात्य अभिनेता पुनीथ राजकुमारला मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीथ राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आणि कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. यानंतर आता कर्नाटक सरकारने मंगळवारी (१६ नोव्हेंबर २०२१) अशी घोषणा केली आहे की, दिवंगत दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार पुनीथ राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार कर्नाटकचा सर्वोच्च पुरस्कार असून पुनीथ हे कर्नाटक रत्न मिळविणारे १०वे व्यक्ती आहेत. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हि घोषणा केली. पुनीथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाचे नाव ‘पुनीथ नामना’ असे ठेवण्यात आले होते.

अभिनेता पुनीथ राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीथ राजकुमार हे कन्नड सिने चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा मुलगा होते. अभिनेता राजकुमार यांना एकूण ५ मुले होती. त्यापैकी पुनीथ सर्वात लहान होते. पुनीथ यांचे वडील राजकुमार देखील प्रसिद्ध अभिनेता होते आणि यांनाही १९९२ साली कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना कवी कुवेंपूसह हा कर्नाटक रत्न पुरस्कार दिला होता. अखेरच्या वेळी हा पुरस्कार डॉ. वीरेंद्र हेगडे यांना २००९ साली समाजसेवेसाठी दिला होता.

कर्नाटक रत्न पुरस्कार हा कर्नाटकचा अत्यंत मोठा आणि मानांकित पुरस्कार आहे. चित्रपट कलाकार यांच्या व्यतिरिक्त, कर्नाटक रत्न हा पुरस्कार राज्यातील अन्य अनेक बड्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना मिळाला आहे. यामध्ये राजकारणाशी संबंधित असलेले एस निजलिंगप्पा, शास्त्रज्ञ सी.एन.आर. राव, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित डॉ. देवीप्रसाद शेट्टी, संगीत जगताशी संबंधित भीमसेन जोशी, समाज सेवक शिवकुमार स्वामीजी आणि डॉ. जे जावरे गौडा यांनाही कर्नाटक रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.