माधुरी पवार म्हणतेय, ‘या बया दाजी आलं’; ‘इर्सल’च्या भन्नाट लावणीनं प्रेक्षकांना लावलं याडं
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ अशी हटके आणि बहारदार टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटातील जब्राट लावणी सध्या रिलीज झाली आहे. दरम्यान आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार हि या लावणीत आपल्या अदांनी प्रेक्षकांना ओढताना दिसतेय. ‘या बया दाजी आलं’ म्हणतं तिने आतापर्यंत कित्येक दाजी घायाळ केले आहेत. आगामी बहुचर्चित ‘इर्सल’ या मराठी चित्रपटात माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी पाहून कुणीही तिच्या एकदा दोनदा नव्हे तर वारंवार प्रेमात पडेल.
‘इर्सल’ या राजकीय वळणाची शैली असणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे. ‘इर्सल’ य चित्रपटाला ‘नाद करायचा नाय’ फेम संगीतकार दिनकर शिर्के यांचे संगीत लाभले आहे. तर माधुरीची ‘या बया दाजी आलं’ हे बहारदार गीतसुद्धा त्यांनीच लिहिलं आहे. ‘या बया दाजी आलं’ या गाण्याबद्दल बोलताना गीतकार आणि संगीतकार दिनकर शिर्के म्हणाले कि, ‘या बया दाजी आलं’ ही लावणी मला एका प्रवासादरम्यान सुचली. एका टमटमच्या मागे हे वाक्य लिहिलेलं होतं आणि एका छोट्या मुलीने ते वाचलं. ते वाचून ती सारखीच गुणगुणतं होती आणि त्यातूनच ही लावणी घडली. उर्मिला धनगरने आपल्या खास शैलीत हि लावणी स्वरबद्ध केली आहे. तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर यांच्या तालावर नृत्यांगना माधुरी पवारने या गाण्याला एक विशेष उंची दिली आहे.
या चित्रपटात, डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, शरद जाधव, संजय मोहिते, सुधीर फडतरे यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार म्हणाले कि, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट आले असतील अगदी नाटकंसुद्धा आली आहेत. बर्याचदा त्यातील मांडणी खूप उच्च स्तरातील असते. मात्र ‘इर्सल’ हा चित्रपट अतिशय खालील फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करणारा आहे. प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार जाणूनबुजून किंवा अप्रत्यक्ष या षडयंत्रात कसा गोवला जातो? ते इर्सलमधून पाहता येईल. हेच या चित्रपटाचे वैशिट्य आहे.