Take a fresh look at your lifestyle.

लोकशाहीर पठ्ठे बापूराव; प्रतिभावान तमाशा कलावंताच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकशाहीर पठ्ठे बापूराव हे असे नाव आहे जे अख्खा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. ज्यांनी ‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनि सोवळे ठेवले घालुन घडी। हाती घेतली मशाल तमाशाची लाज लावली देशोधडी!’ असा आत्मगौरव करत तमाशाला एक मानाचा दर्जा दिला त्या व्यक्तीस विसरणे कुण्या कलावंताला तरी नक्कीच शक्य नाही. बापूराव यांनी आपल्या कारकिर्दीत २ लाखांहून अधिक लावण्या लिहिल्या. तमाशा कलेला पैसे कमावण्याचे साधन नव्हे तर मनाच्या समाधानाची ज्योत मानणाऱ्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या आयुष्याचे भाष्य करणारा एक चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज आहे.

लोकशाहीर पठ्ठे बापूराव नामक शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक मिलिंद कृष्णा सकपाळ यांनी केले आहे. तर कांतीलाल भोसले, निलेश बबनराव देशमुख, रोहन अरविंद गोडांबे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘द मॉर्निंगस्टार फिल्म कंपनी’ ‘असमथी प्रोडक्शन्स’ यांच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे. तर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्या “महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव” आणि “पठ्ठे बापूरावांच्या शोधात” या पुस्तकांवर आधारित हा चित्रपट असणार आहे.

‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ या चित्रपटाची कथा-पटकथा राहुल डोरले यांची आहे तर गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गीते शब्दबद्ध केली आहेत. चित्रपटाचे छायांकन केको नाकाहारा यांनी केले आहे. तर प्रोडक्शन डिझायनर म्हणून संतोष फुटाणे आणि मेकअप, हेअर डिझायनर म्हणून विक्रम गायकवाड लाभले आहेत. कॉस्ट्यूम डिझायनर सचिन लोवलेकर आहेत. तर साउंड मंदार कमलापूरकर यांच्या हाती आहे.

सांस्कृतिक परंपरेची आन बान शान म्हणजे लावणी. या लावणीच्या माध्यमातून श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे शाहीर पठ्ठे बापूराव झाले कसे? त्यांनी काय काय सहन केलं? कशी जपली कला आणि आवड? त्यांचा हा प्रवास किती विषारी होता? हे सर्व काही आपण या चित्रपटात पाहू शकाल. हा चित्रपट संगीतमय असणार आहे. अद्याप चित्रपटातील कलाकार आणि अन्य महत्वाच्या बाबी गुलदस्त्यात आहेत. मात्र शाहीर पठ्ठे बापूराव हा चित्रपट लोक कलावंतांसाठी जिव्हाळ्याची भेट ठरणार हे नक्की.