Take a fresh look at your lifestyle.

अभिषेक बच्चन याच्या चित्रपटाचे लखनऊ पोलिसांनी थांबविले शूटिंग; कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे अभिषेक सध्या लखनऊ मध्ये असून या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. दरम्यान, लखनऊ पोलिसांनी अभिषेक बच्चनच्या या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. लखनऊमधील बेगम हजरत महल पार्कमध्ये हे शूटिंग सुरू असतेवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत कोरोना प्रोटोकॉलचा दाखल देत हे शूटिंग थांबविले.

अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाच्या टीमला चित्रपटाचे शूट करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, असे असूनही पोलिसांनी याचे शूटिंग थांबवले. या संदर्भात पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की, कोरोना प्रोटोकॉल पाहता अभिषेक बच्चन यांच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. खरेतर कारण असे कि, अभिषेक बच्चन आणि त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगबाबत समजताच आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांनी या पार्कजवळ शूटिंग पाहण्यासाठी गर्दी केली होती. बघता बघता लोकांची संख्या वाढू लागली होती.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून, काही लोकांकडून शूटिंगबद्दल तक्रार करण्यात आल्या होत्या. या तक्रारी मिळताच पोलीस तडक घटनास्थळी दाखल झाले. या कारणास्तव त्यांनी शूटिंग थांबवण्यास सांगितले. मध्य विभागाचे डीसीपी सुमन कुमार म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे, कारण शूटिंगदरम्यान सुमारे जवळपास ६० जण पार्कमध्ये उपस्थित होते. जेव्हा चित्रपटाच्या टीमला चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली, तेव्हा त्यांना कोवीड १९ बाबत प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे सांगण्यात आले होते.

कोरोना प्रतिबंध नियमांनुसार उद्याने, सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. मात्र, शूटिंगसाठी दुपारच्या वेळेत हे पार्क उघडण्यात आले होते. यावेळी क्रू आणि जमाव मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे शूटिंग थांबवावी लागली. इतकेच नाही तर चित्रपटाच्या टीमने स्थानिक लोकांवर गुंडगिरी केल्याचा आरोप केला होता. क्रू मेंबर्सचे म्हणणे आहे की, काही स्थानिक लोकांनी पोलिसांसमोर असभ्य कृत्य केले, त्यानंतर हाणामारीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी दक्षता राखीत हा जमाव पळवून लावला.