Take a fresh look at your lifestyle.

महाभारतातील भीमास देवाज्ञा; वयाच्या 75’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| एकेकाळी छोटा पडदा गाजवलेली अध्यात्मिक मालिका महाभारत आजही लोकांच्या लक्षात आहे. याचे कारण म्हणजे मालिकेतील पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी आपले पात्र उठून दिसावे म्हणून केलेली मेहनत. या मालिकेतील भीम हे पात्र लोकांच्या स्मरणात असेलच. यानंतर आज अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भीमाचे पात्र साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे रात्री निधन झाले. आज पंजाबी बाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीम हे पात्र अव्वलरित्या साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी प्रवीण यांचे निधन झाले आहे. प्रवीण कुमार यांची मुलगी निकुनिका यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. निकुनिकाने सांगितल्याप्रमाणे, प्रवीण यांना सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले . रात्री ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ते राहत होते.

अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचा जन्म पंजाबच्या अमृतसर येथील आहे. त्यांनी १९६६ साली कॉमन वेल्थमध्ये सिल्वर मेडल आणि एशियन स्पर्धेत २ वेळा गोल्ड मेडल जिंकल आहे. काही दिवसांपूर्वी भीमचे पात्र साकारणाऱ्या या नायकावर उपासमारीची वेळ आल्याचे समोर आले होते. याबाबत खुद्द प्रवीण कुमार यांनी माध्यमांना माहिती दिली होती. अत्यंत हलाखीच्या काळातून ते गेले. त्यांनी आपल्या परिस्थितीविषयी भाष्य करताना म्हंटले होते की, गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे काम नसल्यामुळे ते घरीच आहेत आणि आता या वयात काम करणे शक्य नाही. अश्यात त्यांच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली आहे. त्यांची पत्नी शक्य ते सर्व काही त्यांच्या काळजीपोटी करते. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे त्यामुळे तिच्याकडे कोणतीही अपेक्षा नाही. परिणामी ते आपल्या पत्नीसोबत जमेल तसे दिवस काढत आहेत. यानंतर अखेर आज त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समोर आले आहे.