Take a fresh look at your lifestyle.

बिग “बी” आपलं “बिग” हार्ट दाखवा; बच्चन बंगल्यासमोर मनसेची पोस्टरबाजी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अत्यंत प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेर मनसे पक्षकाडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांचा मुंबईतील जुहूस्थित प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांनी प्रतिक्षा बंगल्याजवळील भागात पोस्टरबाजी केली आहे. मनसेने प्रतिक्षा बंगल्यासमोर काही बॅनर लावले आहेत. ज्यात त्यांनी बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, असा काहीसा मजकूर लिहिला असल्याचे दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, यासाठी हि पोस्टरबाजी करण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत २०१७ साली मार्गावरील बंगले मालकांना रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी पालिकेकडून नोटीस पाठवली होती. यानंतर २०१९मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याजवळील भिंत पाडली. पण बंगल्याला काही केले नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी मुंबई पालिकेला पत्र लिहिले होते. सर्वसामान्य लोकांची घर तोडता मग बच्चन यांना वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरी सर्वेक्षण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करता येईल, असे उत्तर पालिकेने दिले.

नागरी सर्वेक्षण विभागाने प्रतिक्षा बंगल्याचा कोणता आणि किती भाग ताब्यात घ्यायचा आहे हे निश्चित केली कि कारवाई करु असे उत्तर वॉर्ड ऑफिसने दिले. मुंबई पालिकेने प्रतिक्षा बंगल्याचा अपेक्षित भाग ताब्यात घेण्याकरीता विनंती अर्ज डिसेंबर २०१९मध्ये केला आहे. त्यासाठी आवश्यक शुल्कही भरले. यासाठीची मोजणी फेब्रुवारी २०२१मध्ये झाली आहे. या भागाच्या भौगोलिक रचनेमुळे काही अडचणी येत आहेत. मात्र या प्रकरणी सर्व माहिती नागरी सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली आहे. शिवाय मुंबई महापालिकेने येत्या महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सांगितले आहे.