Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या लोककलेचा होणार सन्मान; सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाइव्ह’मूळे प्रेक्षकांना धुंद चढणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा मनीष कदम लिखित असून पटकथा संजय जाधव यांचीच आहे. चित्रपटाचे संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तर, अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग ‘तमाशा लाईव्ह’चे निर्माता आहेत.

‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजय जाधव बोलताना म्हणाले की, हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. तर कोरिओग्राफी उमेश जाधव यांची आहे. एकंदरीत चित्रपटाची टीम एकदम भन्नाट आहे. मुळात सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मात्र आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. त्यामुळे या प्रोजेक्टबाबत मी खूपच उत्सुक आहे.

शिवाय या चित्रपटाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर व्यक्त होत म्हणाले की, ”संजय जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे दोघेही आपापल्या विभागात एकदम अव्वल आहेत. संजय जाधव सोबत मी ‘अनुराधा’ करत आहे तर सोनाली सोबत मी ‘हाकामारी’ करत आहे आणि आता ‘तमाशा लाईव्ह’च्या निमित्ताने या दोघांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. संगीतमय चित्रपट आम्हीसुद्धा पहिल्यांदाच करत आहोत, त्यामुळे आमची पण उत्सुकता तेवढीच आहे. विषय वेगळा असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.” पोस्टरवरून हा चित्रपट संगीतावर आधारित असल्याचे कळतेय. मात्र या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, यासाठी दिवाळी २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.