Take a fresh look at your lifestyle.

अजूनही ही दूधखुळी..? केतकी म्हणजे लहान मुलगी.. ?; टिळेकरांकडून पोंक्षेंचा समाचार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शक महेश टिळेकर हे नेहमीच सामाजिक तसेच राजकीय विषयांवर भाष्य करत आपले मत व्यक्त करताना दिसतात. अलीकडेच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अपमानकारक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे वाद निर्माण झाला तसेच तिच्यावर कारवाई देखील झाली. एव्हढं झाल्यानंतरही हे प्रकरण शांत झालेलं नाही. तर अजूनही यावरनं वादाचा भडका उडतोय. दरम्यान केतकीची बाजू घेऊन अभिनेते शरद पोंक्षे यांनी तिच्या लहान वयाचा दाखला दिला होता आणि तिला संधी द्या याच राजकरण करू नका असे म्हटले होते. यावरुन आता महेश टिळेकरांनी शरद पोंक्षेंना समाचार घेणारी पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता शरद पोंक्षे यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिची बाजू घेत म्हटलं होतं कि, ”आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो हे माहित असायला पाहिजे. केतकी अजूनही लहान मुलगी आहे. त्यामुळे तिला सुधारण्याची संधी मिळायला हवी असं मला वाटत. शरद पोंक्षे यांच्या या मतावर टिळेकरांनी एक पोस्ट लिहिले आहे/ यामध्ये त्यांनी म्हटलंय कि, ”अजूनही ही दूधखुळी ?.. शारीरिक संभोग, जाती धर्म, जनतेचे आदर्श असणारे इतिहासातील महापुरुष, महामानव, अशा सर्वांवरच उघडपणे वादग्रस्त विधाने करून आणि तशा पोस्ट लिहून आपले अगाध ज्ञान पाजळणारी केतकी म्हणजे लहान मुलगी?” ”वयाच्या तिशीपर्यंत पोचलेल्या ह्या लहान मुलीने समाजात जाती जातींमध्ये तेढ निर्माण होईल आणि लोकांच्या भावना दुखावतील अशा पोस्ट लिहिल्या. तिला जाब विचारणाऱ्या तरुण तरुणींना शब्दांचे खेळ खेळत तिने उलटी उत्तरे दिली, जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली त्यावेळी ज्येष्ठ नट शरद पोंक्षे यांचे पित्त का उसळले नाही? वडीलधाऱ्या कलाकाराच्या नात्याने केतकीला आपली मुलगी मानून या ज्येष्ठ नटाने तिला समजावण्याचा का प्रयत्न केला नाही?आणि त्यांना जर मनापासून वाटतंय की, या लहान मुलीला सुधारण्याची संधी दिली पाहिजे तर शिक्षा मिळून जेलमध्ये जाऊनही अनेकजण सुधारतात.

पुढे लिहिले कि, दीड वर्षापूर्वी तिने केलेल्या वादग्रस्त पोस्ट बाबत सायबर क्राईम आणि वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट केली. तिचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे पोलिसांना तिला संपर्क करणे अवघड जात होते. तिला ओळखणाऱ्या काही मराठी कलाकारांना तिचा पत्ता विचारल्यावर काहींनी माहिती असूनही सहकार्य केले नाही आणि एका मराठी कलाकाराने तिची बाजू घेत जात मध्ये आणून उपदेश देण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो माझ्या मनातून उतरला. पण पोलिसांनी नंतर तिला संपर्क साधून नोटीस पाठवली. त्यावेळी ती धावत पोलीस स्टेशनमध्ये आली आणि केलेल्या कृत्याबद्दल माफीनामा लिहून दिला. कागदपत्रांवर सही करताना स्वतः ची ओळख अभिनेत्री अशी न लिहिता सही खाली समाजसेविका असे तिनं लिहिलं. समाजात जातींमध्ये द्वेष पसरविणारी मुलगी स्वतः ची ओळख समाजसेविका म्हणून दाखवते याची मला कीव आली.

पोलिसी खाक्या बघून आता तरी ती सुतासारखी सरळ होईल असं वाटलं होतं, पण काही महिन्यांनंतर पुन्हा उसळी मारून ही अबला समाजसेविका पुन्हा प्रकट झाली. सुधारण्याची संधी मिळूनही जी सुधारली नाही अश्या मुलीला, जातीचे लेबल लावून जर कुणी तिला सहानुभूती मिळण्यासाठी समर्थन देण्यासाठी एकत्र येत असतील तर समाजासाठी पण हे घातक आहे. हिच्या बद्दल सहानुभूती वाटणारे हेच लोक उद्या या अबला वाटणाऱ्या मुलीला पुरस्कार देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तिला फुस लावण्याचं काम करून तिला मोठं करण्याचा प्रयत्न करतील अशी शंका वाटते.