Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देणारा नेता नाही..; टिळेकरांची सरकारवर आगपाखड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आणखी एक आत्महत्या.. उद्या आणखी एक शेतकरी मरेल.. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाच्या संपूर्ण भविष्याची अशी राखरांगोळी होईल आणि आपण.. आपण आणि आपलं सरकार २ मिनिटं श्रद्धांजली वाहू थोडी टिपूसं गाळू आणि पुन्हा पूर्वस्तरावर. याच ज्वलंत विषयाला वाचा फुटावी आणि आता तरी व्यवस्थेला पाझर फुटावा म्हणून दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर सक्रिय झाले आहेत. त्यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी बीड येथील एका शेतकऱ्याने उसाच्या फाडला आग लावून आत्महत्या केल्याच्या भीषण प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. सर्व स्तरावर शोक व्यक्त केला जात असताना यावर काही ठोस उपाययोजना नसल्यामुळे राजकारणी तसेच व्यवस्थेला कारणीभूत धरत त्यांनी जाब विचारला आहे.

या संदर्भात महेश टिळेकर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. अतिशय दीर्घ आणि न्याय अन्यायाला भेद देणारी हि फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. हि पोस्ट लिहिताना महेश टिळेकर यांनी लिहिले आहे कि, ‘आणखी एक आत्महत्या.. शेतीप्रधान देशात बळीराजा सुखी नाही. व्यवस्थेने बळी घेतलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला मीडिया घेऊन नेते मंडळी गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत जातील, न्यूज चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज सुरू होतील, या घटनेचं भांडवल करून त्यात राजकीय रंग भरून विरोधक सत्ताधारी पक्षावर तुटून पडेल . पण.. पण जीवाला मुकलेल्या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आधार देणारा कुणी नेता नाही..’

महेश टिळेकर यांनी पुढे लिहिले आहे कि, ‘आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्याची बायको दुःख पचवून जगण्यासाठी इतरांच्या शेतात रोजंदारीवर खुरपणी करताना दिसेल. समाजातील तुम्ही आम्ही शिकली सवरलेली माणसं हॉटेलमध्ये जेऊन निमूटपणे आलेलं बिल देणारे शेतकऱ्याकडून २० रुपयांची भाजीची गड्डी घेताना मात्र घासाघीस करताना दिसू. शेतकऱ्याच्या कष्टाचं आणि आटवलेल्या रक्ताचं मोल व्यवस्थेला कळणार कधी? भारत माझा देश आहे आणि या देशातील शेतकरी माझे अन्नदाते आहेत ही भावना सगळ्यांच्या मनात रुजणार कधी??’ असा प्रश्न टिळेकर यांनी व्यवस्थेला विचारला आहे.