Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मीर पंडितांच्या जीवनावर आधारित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून अनेकनाच्या भावना याच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर पंडितांनी साहलेले दुःख लोकांसमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. त्यामुळे अतिरेक्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टा दाखविणाऱ्या या चित्रपटाला करमाफी द्यावी, अशी मागणी भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी द काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त करा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकून वरील मागणीला आणखी जोर दिला आहे. या चित्रपटात विभाजनवादी अतिरेक्यांच्या कारवायांमुळे काश्मीर सोडावे लागलेल्या जनतेची सत्यकथा दर्शवली आहे.

अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितांवर केलेल्या अत्याचाराचे वर्णन प्रथमच चित्रपटातून जनतेसमोर येत आहे. त्यामुळे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे या चित्रपटाला करमाफी देतील, अशी मला खात्री आहे. तसेच चित्रपटाला करमाफी देऊन हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा यासाठी मुख्यमंत्री प्रोत्साहन देतील, असा मला विश्वास असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

तर ट्विटच्या माध्यमातून मात्र त्यांनी खोचक टीकाच करणे सोयीचे समजले आहे. ट्विटरवर अतुल भातखळकर यांनी लिहिले कि, आम्ही काश्मीर फाईल्ससाठी करमाफी मागितली आहे, परंतु करंटे ठाकरे सरकार ती देणार नाही हेही निश्चित. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.