Take a fresh look at your lifestyle.

फॅमिली मॅनला नडला आणि परत तोंडावर पडला; मनोज वाजपेयीने KRK’वर ठोकला मानहानीचा दावा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमधील स्वयंघोषित समीक्षक कमाल राशिद खान अर्थात KRK आजकाल सारखाच चर्चेत असतो. याच कारण म्हणजे तो करीत असलेले वादग्रस्त ट्विट. एखादा मुद्दा मिळाला कि KRK ट्विटरवर मुक्ताफळं उधळतो आणि मग वादांच्या भोवऱ्यात अडकतो. आतापर्यंत एकदाही असे झाले नाही कि, केआरकेने ट्वीट केले आणि त्यावरून वाद झाला नाही. बॉलिवूडच्या भैजांसोबत पंगा घेतल्यानंतर आता अलीकडेच KRK फॅमिली मॅनला नडला आहे. अर्थात बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत त्याने पंगा घेतला हा पंगा त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. कारण मनोज वाजपेयीने मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात थेट मानहानीचा दावा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांचे वकील परेश एस. जोशी याच्या माध्यमातून अभिनेत्याने KRKवर मानहानीचा दावा ठोकला आहे. वकील परेश एस जोशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मनोज वाजपेयी यांच्या वतीने कमाल राशिद खान विरोधात एका आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. KRK विरोधात कलम ५०० अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती यात केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २६ जुलै २०२१ रोजी अभिनेता मनोज वाजपेयी विरोधात KRKने अपमानास्पद ट्वीट केले होते. यामुळे इंदौरमधील चाहत्यांमध्ये मनोज वाजपेयी यांची प्रतिमा खराब झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान KRKने २६ जुलैला मनोज वाजपेयीविरोधात एक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने मनोज वाजपेयीला ‘चरसी’ आणि ‘गंजेडी’ असे संबोधले होते. जे निश्चितच अतिशय अपमानास्पद आहे. अभिनेता मनोज वाजपेयीची ‘फॅमिली मॅन २’ ही ऍमेझॉन प्राईम वरील वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर KRKने सोशल मीडिया ट्विटवर मुक्ताफळं उधळली होती. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते कि, ‘मी फालतु नाही आणि म्हणून मी वेबसीरिज पाहत नाही. तुम्हाला चरसी आणि गंजेडी मनोज का आवडतो? तुम्ही बॉलिवूडच्या चरसी आणि गंजेडी लोकांचा राग करता, मग सर्वांचाच राग करा,’. या अशा आशयाचे ट्वीट करीत KRKने अभिनेता मनोज वाजपेयीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न केला होता.

या बातमीच्या वेगाने पसरण्यानंतर मनोज वाजपेयीच्या अनेक चाहत्यांनी KRK वर टीकांचा पाऊस पाडला आहे. अनेक जण बरं झालं, येह बात, फॅमिली मॅनला नडला आणि परत तोंडावर पडला अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याआधी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खाननेसुद्धा KRK विरुद्ध तक्रार दाखल केली होती. तेव्हा KRKने सलमान आणि त्याच्या अधिकारातील कंपनी बीइंग ह्यूमन विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोपाखाली सलमानच्या वकिलांच्या वतीने मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता.