‘मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती’; मानसी नाईकचे विधान चर्चेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी‘ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज करतेवेळी यात कोणती भूमिका कोण साकारतेय हे सांगितलं नव्हतं. पण पुढे लक्षवेधी पद्धतीने याचा खुलासा केला गेला. अखेर या चित्रपटात ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार असल्याचे समजल्यानंतर ती चंद्रमुखी कोण असेल असा सवाल सर्वांना पडला होता. अखेर हि चंद्रमुखी अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार असल्याचे स्पष्ट होताच सर्वांची उत्सुकता वाढली आहे. मात्र आता अभिनेत्री मानसी नाईकने ‘मी चांगल्या प्रकारे ही भूमिका केली असती’, असे विधान केल्यामुळे सर्वांच्या नजरा मानसीकडे वळल्या आहेत.
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान मानसी नाईकने ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेविषयी मत मांडले आहे. यावेळी तिला ही भूमिका तू केली असतीस का? असे विचारले असता उत्तर देताना ती म्हणाली कि, ‘मी याबद्दल काहीही नाही बोललं तरच चांगलं आहे. पण माझ्या या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आहेत. त्या चित्रपटाचे लेखन करण्यापासून ते शुटींग करणारी मंडळी या सर्वांसाठी मी फार खूश आहे. पण मला असं वाटतं की मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती’. यामुळे मानसीने अमृताला टक्कर देण्याबाबत चांगलाच विश्वास दाखवला आहे.
तर आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अमृता खानविलकर म्हणाली कि, ‘ मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी आणि ताकदीची भूमिका मी ‘चंद्रमुखी’मध्ये साकारतेय. चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मला खूप आनंद आहे की, अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. अनेक दिवसांपासून ‘चंद्रमुखी’च्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला. जी उत्सुकता तुम्हाला होती, तशीच उत्सुकता आता मला चित्रपट झळकण्याची आहे. हा चित्रपट आम्ही या लोककलावंताना समर्पित करत आहोत. या निमित्ताने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असून या भव्य चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच घ्यावा.