Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेता अजिंक्य देव यांचा ५८वा वाढदिवस; मराठी सिनेसृष्टी ते हॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत घेतली गरुडझेप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंतचा पल्ला गाठणारे दिग्गज अभिनेते अजिंक्य देव यांचा आज ५८वा वाढदिवस आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक प्रगल्भ अभिनेता म्हणून अजिंक्य देव यांची विशेष ओळख आहे. केवळ अभिनय नव्हे तर त्यांच्या देखण्या व्यक्तीमत्वाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ पाडली होती. अजिंक्य देव यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम करीत आपला प्रेक्षक वर्ग तयार केला आहे.

अभिनेते अजिंक्य देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अजिंक्य देव यांचा जन्म ३ मे १९६३ रोजी झाला. अतिशय हुशार, हरहुन्नरी आणि दिमाखदार व्यक्तिमत्वासह आवाजातील ठेहराव हे त्यांच्या अभिनय शैलीतील खास पैलू. अजिंक्य देव याना जन्मतःच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांचे ते पुत्र आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी ‘अर्धांगी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यापुढे न थांबता, न वळता मराठी चित्रपटापासून ते हॉलिवूडपर्यंत बघता बघता त्यांनी मजल मारली. त्यांचा हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.

अजिंक्य देव यांचा १९८७ साली प्रदर्शित झालेला ‘सर्जा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले होते. याच वर्षी त्यांनी ‘संसार’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि अभिनेता राज बब्बर यांच्यासह स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटात त्यांनी रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती.

१९९६ साली ‘द पिकॉक स्प्रिंग’ या चित्रपटातून त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१९ मध्ये ‘द वॉरिअर क्वीन ऑफ झाँसी’ या हॉलिवूड चित्रपटात त्यांनी तात्या टोपे यांची भूमिका जबाबदारीनीशी साकारली होती. तर २०२० मध्ये ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. तसे पाहता अजिंक्य देव यांनी सिनेसृष्टीत खूप असे काम केले नाही. मात्र जेवढे काम करीत त्यांनी प्रेक्षकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिली तेवढे काम नक्कीच विशेष आहे. त्यांनी निभावल्या भूमिकांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.