चर्चा तर होणारचं! मनसेच्या दहीहंडीला प्रवीण तरडेंचा १००% पाठिंबा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना नामक विषाणूने आपला कहर केला आहे. त्यामुळे गेले दीड वर्षांपासून जणू जगणे कठीण झाले आहे. ना घरातून बाहेर पडायची सोय, ना सण, ना उत्सव, ना वारी.. इतकंच काय तर शिक्षण आणि नोकऱ्या दोन्हीही अडचणीत. त्यामुळे गेल्या दीड वर्षांत काही साजरं झालं असेल तर ते आहे लॉक डाऊन. दहिहंडी हा असा सण आहे जो महाराष्ट्रात अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे हा सणही साजरा झाला नाही. मात्र यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहिहंडी साजरी करण्याची मोठी घोषणा केली आहे. मनसेच्या या घोषणेनंतर मराठी निर्माता – अभिनेता प्रविण तरडे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे आहे आणि मी नाचायला येणार, असेही म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अभिजित पानसे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दहिहंडीबाबत हि मोठी घोषणा केली आहे. ‘विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जाहिर केले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असे आवाहन अभिजित पानसे यांनी लोकांना केले आहे. त्यांच्या या पोस्टवर प्रविण तरडे यांनी ‘१०० टक्के नाचायला येणार’ अशी कमेंट करीत मनसेला आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांची ही कमेंट पाहताच चाहत्यांचा उत्साह मात्र द्विगुणित झाला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी या उत्सवाला जाण्यासाठी मांड्या थोपटल्या असतील, असा अंदाज लावणे वावगे ठरणार नाही.
मुळात ठाणे हा जिल्हा दहिहंडीच्या उत्सवासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक अशा विविध मोठमोठ्या जिल्ह्यांतून अनेको बाळगोपाळ दहिहंडी पथके या उत्सवासाठी ठाण्यात दाखल होत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी दहिहंडीचा दरवर्षी होणारा हा मोठा उत्सव रद्द करण्यात आला आणि अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात उत्सवदिनी अगदीच रस्ते शांत आणि भयाण शांततेत पाहायला मिळाले होते. पण आता मनसेने मनावर घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेच्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लोकांचे निश्चितच या निर्णयाला विशेष समर्थन आहे मात्र राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे, हे ही तितकेच खरे.