Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन; गौरव मोरेने शेअर केली भावुक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून न जाणे कित्येकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अया दरम्यान हृदय विकार आणि वाढत्या वयामूळे अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. एकंदरच वर्षभरापासून चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का लागला आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मराठी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील अभिनेता उज्वल धनगर याचे सोमवारी (२८ जून) निधन झाले आहे. गंभीर बाब अशी कि २८ वर्षीय उज्वलचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे याने सोशल मीडियावर पोस्ट करून उज्वल धनगरच्या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

 

 

गौरवने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिवंगत अभिनेता उज्वल रघुनाथ धनगर याच्या अधिकृत अकाउंटला टॅग करत लिहिले की, “भावपूर्ण श्रद्धांजली. आज सकाळी अभिनेता, निवेदक उज्वलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.” याशिवाय अन्य अनेक कलाकारांनीही उज्वलच्या निधनाची बातमी समजताच या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता प्रसाद खांडकेकरने उज्वलला श्रद्धांजली वाहत लिहिले की, “खूप शॉकिंग आहे हे, भावपूर्ण श्रद्धांजली.” तसेच अभिनेता निखिल राऊत यानेही “भावपूर्ण श्रद्धांजली” लिहित उज्वलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

दिवंगत मराठमोळा अभिनेता उज्वल धनगर याने कमी वयातच मराठी मालिकांच्या जगतात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’व्यतिरिक्त ‘लक्ष्य’, ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने सहाय्यक भूमिकांमधून प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वेधले होते आणि अव्वल काम केले होते. विशेष म्हणजे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत खाशाबाची भूमिका देखील त्यानेच अगदी पूर्ण पात्रतेने निभावली होती. या व्यतिरिक्त आजपर्यंत अनेक कार्यक्रमांचे निवेदनही त्याने केले होते.