‘तमाशा Live’ चित्रपटावर मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव; पहा व्हिडीओ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध धाटणीची गाणी आणि एक हटके कथानक घेऊन ‘तमाशा Live’ हा चित्रपट १५ जुलै २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. तर या चित्रपटाची स्टारकास्ट एकदम जबरदस्त आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जर तुम्हालाही मुलगी असेल तर हा चित्रपट जरूर पहा असे कॅप्शन देत संजय जाधव याची चित्रपटाच्या कथानकाची उजवी बाजू अनुभवातून सांगितली होती. यानंतर अखेर हा चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी यावर प्रचंड प्रेम केले आहे. इतकेच काय तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करीत कलाकारांच्या प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मुक्ता बर्वे प्रतिक्रिया देताना म्हणाली आहे कि, अत्यंत अमेझिंग फिल्म आहे. मराठी म्युझिकल आहे. यात खूप गाणी आहेत. याशिवाय प्राजक्ता माळी म्हणतेय कि, खूप छान चित्रपट आहे आणि मला खूप आवडला. आजकाल चित्रपट, मालिकांपेक्षा जास्त न्यूज चॅनेल पाहिले जातात.. ते का..? आणि काय असत त्याच्या पाठीमागे..? हे सगळं या चित्रपटात उत्तमरीत्या दाखवलं आहे. हा चित्रपट उत्तमरीत्या लिहिला आहे.
तसेच हेमंत ढोमे याने प्रतिक्रिया देताना सांगितले आहे कि, हा चित्रपट अतिशय एनर्जेटिक, वेगळा आणि खरा प्रयत्न होता. या सिनेमासाठी घेतलेली मेहनत संजय जाधव, प्लॅनेट मराठी आणि टीम यांची पडद्यावर दिसते. अतिशय वेगळा फॉर्म आणि अतिशय वेगळी मांडणी या चित्रपटाची आहे. तर क्रांती रेडकर म्हणाली कि, संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सचित, सोनाली, सिद्धार्थ, हेमांगी प्रत्येकाची भूमिका छान आहे. प्रत्येक आर्टिस्ट हा सिनेमा जगला आहे. या सिनेमाची गाणी या सिनेमाची सुपरस्टार आहेत.
तसेच सायली संजीव म्हणाली कि, सिनेमा उत्तम आहे आणि एखादी नवीन आणि वेगळी गोष्ट करायला धारिष्ट लागत. ते यातून दिसत. प्रत्येकाची मेहनत दिसते. एव्हढी गाणी कोरिओग्राफ करणं, प्रेझेंट करणं आणि बाकी सगळंच.. कठीण आहे. पण तितक्याच सोप्या पद्धतीने संजय दादाने यातून आपल्यापर्यंत पोहचवली आहे. याशिवाय गश्मीर महाजनी म्हणतोय कि, पथ नाट्याचं एक स्वरूप असतं.. एक फॉरमॅट असतो. ज्यामध्ये संवादाचे प्रसंग हे नृत्य आणि संगीतासोबत त्याची कथा पुढे नेली जाते. असं नाही कि, एखाद रोमँटिक गाणं झालं.. मग ऍक्शननंतर एखाद धमाकेदार आयटम सॉंग झालं. तर असं नाहीये.. हि गाणीदेखील कथेला पुढे नेत असतात. यामुळे मनोरंजनाचा दर्जा वर जातो.
एकंदरच काय कि, ‘तमाशा Live’ या चित्रपटाला केवळ प्रेक्षक नव्हे तर समीक्षक आणि अगदी इतर कलाकार देखील आत्मीयतेने पाहत आहेत. ज्यामुळे ‘तमाशा Live’ हा सिनेमा खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन घेऊन आला आहे हे सिद्ध होत. या कलाकारांशिवाय आणखी बऱ्याच कलाकारांनी ‘तमाशा Live’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.