हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १८ मे आणि आज मराठी सिनेविश्वाची लाडकी अभिनेत्री जिची ‘अप्सरा’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख आहे तीचा वाढदिवस आहे. अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस. सोनाली वयाचे ३५ वे वर्ष साजरे करत आहे. वयाच्या या टप्प्यात सोनालीने स्वतःची एक हक्काची जागा सिनेविश्वात आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामनांत तयार केली आहे. आपण सोनालीला विविध चित्रपटात विविध भूमिका साकारताना पाहिले आहे. पण सोनालीच्या अभिनेत्री होण्याआधीचं आयुष्य फार कमी लोकांना ठाऊक आहे. म्हणूनच आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
दिनांक १८ मे १९८८ रोजी एका चिमुकल्या कन्येनं पुण्यातील खडकी येथे लष्करी छावणीत जन्म घेतला. ही चिमुकली कन्या म्हणजेच सोनाली कुलकर्णी. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत. आयुष्यातील ३० वर्ष त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात काम केले आहे. तर सोनालीची आई सविंदर कुलकर्णी या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD (सेन्ट्रल आॅर्डनन्स डेपो) येथे काम केले आहे. सोनालीला एक लहान भाऊ आहे. ज्याचं नाव अतुल आहे. बहिणीवर जीवापाड प्रेम आहे. सोनालीच्या भावाची स्वतःची फ्लेडर्स नावाची इव्हेंट कंपनी आहे. याशिवाय सोनालीच्या कुटुंबाचा अगदी महत्वाचा भाग आज्जी सुशीला कुलकर्णी. त्यांचे गतवर्षी ऑगस्टमध्ये निधन झाल्यानंतर संपूर्ण कुलकर्णी कुटुंब अस्वस्थ झाले होते. सोनाली आज्जीची लाडकी होती आणि त्यामुळे आजीच्या निधनाचा सोनालीला मोठा धक्का लागला होता.
सोनालीच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, तिचं प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झालं. तर माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झालं. यानंतर सोनालीने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे आणि पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले. आज जर सोनाली सिने क्षेत्रात आघाडीची अभिनेत्री नसती तर पत्रकारितेत नक्की आघाडीच्या स्तरावर कार्यरत असती यात काही शंकाच नाही.
सोनालीने पत्रकारितेचे शिक्षण घेतले असले तरीही तिची आवड आणि कल अभिनयाकडे होता. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. पण या चित्रपटातून ती फारशी प्रकाशझोतात येऊ शकली नाही.
सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ चित्रपटातून. या चित्रपटात तिने ‘अप्सरा आली’ या गाण्यावर सादर केलेले लावणी नृत्य प्रचंड गाजले. तिचे मनमोहक सौंदर्य, नृत्याविष्कार आणि चेहऱ्यावरील तेज अवघ्या महाराष्ट्राला भावले. अक्षरशः प्रेक्षक तिच्या सौंदर्याचे दिवाने झाले होते आणि इथूनच सोनाली कुलकर्णी झाली मराठी सिनेसृष्टीची ‘अप्सरा’.
यानंतर सोनाली कुलकर्णी कधी थांबली नाही कि मागे वळली नाही. सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील पदार्पण केलं. रितेश देशमुखसोबत ती ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात दिसली होती. तिने या चित्रपटात रितेश देशमुखची पत्नी ममताची भूमिका साकारली होती. आतापर्यंत सोनाली कुलकर्णीने ‘आबा झिंदाबाद’, ‘हाय काय नाय काय’, ‘समुद्र’, ‘गाढवाचं लग्न’, ‘सा सासूचा’, ‘नटरंग’, ‘अजिंठा’, ‘इरादा पक्का’, ‘गोष्ट लग्नाची’, ‘झपाटलेला 2’, ‘रमा माधव’, ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’, ‘व्हिक्टोरिया’, ‘शटर’, ‘पोश्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘तुला कळणार नाही’, ‘हम्पी’, ‘ती आणि ती’, ‘हिरकणी’, ‘विकी वेलिंगकर’ या चित्रपटात सोनालीने काम केले आहे. याशिवाय येत्या काळात सोनाली आणखी काही चित्रपटांत दिसणार आहे. यातील ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
सोनाली कुलकर्णीने लॉकडाउनच्या काळात कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी त्यांच्या लग्नाला कुणी उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणूनच कोरोना काळानंतर लग्नाला एक वर्ष होताच त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘मी, ती अँड ती’ या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु असताना शूटिंग सेटवर कुटुंबीयांच्या मदतीने सोनालीची कुणालशी भेट झाली. त्यानंतर काही दिवसातच कुणालने तिला लग्नाची मागणी घातली आणि सोनालीने होकार दिला. मग काय सोनाली झाली ना मिसेस बेनोडेकर.
आज सोनाली एक अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल आहेच. पण तत्पूर्वी ती एक स्त्री आहे. कुणाची लेक, कुणाची सून, कुणाची ताई तर कुणाची पत्नी आहे. एकावेळी रील लाईफ आणि रिअल लाईफचा समतोल राखताना तिची तारांबळ उडत असेल. पण हि जबाबदारी ती अव्वलरित्या सांभाळताना दिसते आहे. म्हणूनच सोनालीला भविष्यात आणखी नव्या संधी मिळाव्या आणि उत्तरोत्तर प्रगती करावी ही इच्छा!
Discussion about this post