मराठी अभिनेत्री वर्षा दांदळे अपघातात जखमी; इंस्टाग्रामवर पोस्ट करीत प्रकृतीची दिली माहिती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मराठी नाटके आणि लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वर्षा दांदळे सध्या अंथरुणातच पडून आहेत आणि याचे कारण त्यांचा झालेला भीषण अपघात आहे. होय. अलीकडेच वर्षा दांदळे यांचा एक अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना बरीच दुखापत झाली असल्याची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या चाहत्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन देखील केले आहे.
अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर आपल्या प्रकृतीची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. हि पोस्ट करत वर्ष यांनी आपल्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केल आहे. दरम्यान चिंतेची बाब अशी कि, वर्षा दांदळे यांना अपघातामध्ये पाठीच्या कण्याला जबर मार बसला आहे आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. सोबतच त्यांनी अंथरूणातला फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. हा फोटो आणि पोस्ट पाहिल्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्षा दांदळे यांच्या पोस्टवर कलाविश्वात त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी कमेंट करत त्यांना आराम करण्याचा आणि स्वतःची पूर्णपणे काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
कलाक्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याआधी वर्षा दांदळे या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. यानंतर ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेत त्यांनी वठवलेली ‘वच्छी आत्या’ इतकी ठसकेबाज होती कि हि भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे. याच भूमिकेमुळे वर्षा दांदळे या खूपच लोकप्रिय झाल्या. टेलिव्हिजनवर त्यांनी नुकतेच ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत काम केले होते. यामध्ये त्यांनी ‘उषा मावशी’ ची भूमिका साकारली होती. तर ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘ घाडगे आणि सून’, ‘कृपा-सिंधू’, एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला आहे.