Take a fresh look at your lifestyle.

रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून ‘छुपे रुस्तम’ रंगभूमीवर येण्यास सज्ज…

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून मराठी रंगभूमी गाजवण्यासाठी एक नव कोरं आणि खळखळून हसवेल असं बहारदार नाटक येऊ घातलं आहे. ज्याचं नाव आहे… ‘छुपे रुस्तम’. त्यामुळे मराठी नाट्य रसिकांनो पोट धरून हसण्यासाठी व्हा तयार.. मराठी मनोरंजन विश्वात विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करणारे २ दिग्गज अभिनेते एकाच कलाकृतीतून समोर येत आहेत. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही भागात हातखंडा असलेले अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ‘छुपे रूस्तम’च्या माध्यामातून आपले मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित २ अंकी नाटक ‘छुपे रुस्तम’ येत्या १५ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी हास्य विनोदाचा ब्लास्ट घेऊन खुमासदार शैलीतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येते आहे.

गंमत- जमत, कुजबुज किरकिर आणि लपवाछपवी असं सगळं काही या एकाच नाटकात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी नक्कीच एक अनोखी अशी पर्वणी असणार आहे यात काहीच वाद नाही. दरम्यान या नाटकाबाबत बोलताना हे दोन्ही हरहुन्नरी कलाकार सांगतात कि, खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी आहे.

प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ या मराठमोळ्या हास्य नाटिकेची निर्मिती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धेमध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकाने वाहवाह मिळवली आहे. याशिवाय विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ या सारख्या नाटकाची निर्मितीदेखील यांनीच केली आहे. लेखक तेजस रानडे यांनी ‘छुपे रुस्तम’ या नाटकाचे लेखन केले आहे. तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे आणि संगीत अजित परब यांचे आहे. तर प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. हे नाटक जरूर पहा आणि खळखळून हसा रिलेक्स व्हा!