Take a fresh look at your lifestyle.

‘मी वसंतराव!’; गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफिल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या ५२’व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभाग चित्रपट श्रेणीमध्ये सादर झालेला संगीतमय ‘मी वसंतराव’ हा चित्रपट अभिजात संगीतातील महान कलाकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अवलिया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या घडणीचा प्रवास दर्शवितो. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी आपली उत्सुकता ताणून धरली आहे. अखेर प्रतीक्षा संपली असून येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र राज्यभरात ‘मी वसंतराव’ हा संगीतमय चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत स्वतः दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी माहिती दिली आहे.

मी वसंतराव चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करताना लिहिले कि, माझं एक स्वप्न पूर्ण होणार.. यंदाचा गुढी पाडवा खास आहे! या ट्विटवर अनेकांनी शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबत माध्यमांशी बोलताना निपुण धर्माधिकारी म्हणाले कि, ‘चित्रपटाची कथा वसंतराव देशपांडे यांची असली तरीही त्यामध्ये कलाकार होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सार्वत्रिक ओढ आहे.’ या चित्रपटात वसंतरावांच्या जीवनात काय घडले याचे वर्णन करण्यात आले आहे.

पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात, विदर्भातील एका खेड्यात जन्मलेल्या आणि नंतर नागपूर येथे त्यांच्या आईकडून एकहाती जोपासना झालेल्या वसंतरावांचे जीवन म्हणजे त्यांच्या आयुष्याला आणि संगीत साधनेला आकार देणाऱ्या उत्कंठावर्धक घटनांचा कॅनव्हास आहे. त्यांचे जीवन घडविणाऱ्या घटनांमध्ये या महान कलाकाराची पु.ल.देशपांडे आणि बेगम अख्तर यांच्या अनोख्या मैत्रीचा, भारतीय सैन्यातील नोकरी, लाहोरमध्ये घेतलेले संगीत शिक्षण, १९६२च्या युद्धात भारत-चीन सीमेवर त्यांची झालेली नेमणूक आणि त्यांना मोठी ख्याती मिळवून देणारी कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकात केलेली भूमिका यांचा समावेश आहे.

‘मी वसंतराव’ यामध्ये वसंतरावांची भूमिका त्यांचे नातू आणि प्रमुख समकालीन शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी भूषविली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना, दिग्दर्शक म्हणाले, ‘राहुल देशपांडे यांच्यासोबत मी काम केले आहे आणि आम्ही एकत्रपणे संगीत नाटकांना पुनरुज्जीवित केले. व्यावसायिक अभिनेता नसूनही त्यांनी ही भूमिका अत्यंत समर्थपणे केली आहे.’ वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालिकडचे असल्यामुळे या चित्रपटाची कथा तयार करण्यास दोन वर्षे लागली असे धर्माधिकारी यांनी सांगितले.