Take a fresh look at your lifestyle.

‘पावनखिंड’ चित्रपटाची बेलगाम घोडदौड; आठवड्याभरात नव्या विक्रमावर शिक्का

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर पावनखिंड या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून प्रेक्षकवर्गासाठी एक पर्वणी ठरला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर ‘पावनखिंड’ हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट आहे.

या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर पावनखिंडीचा रक्तरंजीत इतिहास दर्शविला आहे. यात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची हि अमर गाथा पाहायला मिळतेय. चित्रपट रिलीज झाल्यापासून आज आठवडा झाला आहे आणि तरीही चित्रपटाची एकही तिकीट वाया गेलेली नाही. प्रत्येक शो हाऊसफुल्ल होणारा हा ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करताना दिसतोय.

‘पावनखिंड’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५३० शोजसह चित्रपटगृहात धमाल उडवली. यानंतर शनिवारी ४२१ चित्रपटगृहांमध्ये १९१० शो लागले ते देखील हाऊसफुल्ल. गेल्या आठवड्याभरात असेच अनेक हाऊसफुल्ल शो लागणारा हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय ठरला आहे.

मराठमोळा पोशाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल-ताशे आणि तुताऱ्यांच्या निनादात ‘पावनखिंड’चे शो अक्षरशः गाजताना दिसत आहेत. अगदी अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एका तरुणाने शिवगर्जना देखील केल्याचे पाहायला मिळाले.

‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा दर्शवली आहे. चित्रपटाचे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांमूळे आधीच चित्रपटाबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी ‘पावनखिंड’ पाहण्यासाठी गर्दी केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या ३ दिवसांत ६ कोटी रुपयांचा गल्ला तर विकेंडला सलग शुक्रवारी १.१५ कोटी रुपये, शनिवारी २.०५ कोटी रुपये आणि रविवारी ३ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.