Take a fresh look at your lifestyle.

सगळंच खूप सोपं नसतं रावssss; व्यावसायिक चित्रपट निर्मात्यांना ‘निर्बुद्ध’ म्हणणाऱ्यांवर विजू माने संतापले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पांडू हा मराठी चित्रपट सध्या संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालतोय. सलग ५ आठ्वड्यानंतरही हा चित्रपट अजूनसुद्धा थिएटरमध्ये हाऊसफुल्लची पाटी पटकावतोय. मात्र तरीही काही लोकांना या चित्रपटाचे यश काही फारसे भावल्याचे दिसत नाही. अश्यावेळी हे लोक चित्रपटाचे कथानक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमला एकंदरच वेड्यात काढताना दिसतात. अनेकांनी अध्याय पद्धतीने व्यावसायिक चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांवर निशाणा साधत त्यांना निर्बुद्ध म्हटले आहे. आपल्या कामाप्रती आदर बाळगणारे आणि एखादा चित्रपट बनवताना बुद्धी, शक्तीचा कस लावणारे पडद्यावरील तसेच पडद्यामागील कलाकार दुखावणे फार साहजिक आहे. याविषयी व्यक्त होत आपला संताप दर्शविणारी एक पोस्ट निर्माता विजू माने यांनी फेसबुकवर शेअर केली आहे, यात पांडू चित्रपटामागील मेहनत दाखवणारा प्री प्रॉडक्शनच्या व्हिडीओही शेअर केला आहे.

 

विजू माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, व्यावसायिक सिनेमा बनवणारे निर्माते- दिग्दर्शक यांना *निर्बुद्ध* या कॅटेगरीत टाकण्याची एक स्पर्धा काही मोजक्या लोकांकडून सोशल मीडियावर लागलेली दिसते. अशा प्रकारचा सिनेमा बनवणं अत्यंत सोपं असतं, सेटवर काही प्रचलित कलाकार, काही ऍक्शन डायरेक्टर्स, सुपरहिट गाणी देणारे संगीतकार घेऊन जायचं, कॅमेरा ठेवायचा आणि जे काही सुचेल तसं बोलायला लावायचं.

मग टेबलवर बसून त्यातल्या काही गोष्टी डिलीट करायच्या, की झाला व्यावसायिक सिनेमा. असा एक सरसकट समज असतो. विशेषतः फेसबुकवर आपले सिनेमाबद्दलचे व्याकरणपूरक अगाध ज्ञान पाजायला ही मंडळी पहाटेपासून तयार असतात.

पुढे म्हणाले, मी या सगळ्यांना कधीच उत्तर किंवा स्पष्टीकरण देत नाही. *मला प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीचा आणि निवडीचा आदर आहे म्हणून. फक्त यातल्या *त्या* लोकांचा खूप राग येतो, जे सगळे सिनेमे फक्त चोरून डाऊनलोड करून बघतात. मग तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘कोर्ट’ असो अथवा त्यांच्या मते निर्बुद्ध आणि न विचार करता केला गेलेला #पांडू. व्यावसायिक सिनेमा बनवताना काय काय विचार करावा लागतो या बद्दलचं एक सेमिनार मी लवकरच घेणार आहे.

मी हे सेमिनार घेणार कारण, iffi सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात देखील माझा एक सिनेमा निवडला गेलेला आहे आणि बॉक्स ऑफिस वर कोरोनानंतरच्या काळात अपेक्षित व्यवसाय देखील एका सिनेमाने दाखवलेला आहे. या सेमिनारची तारीख लवकरच जाहीर करीन. (कोरोना आणखी किती निर्बंध आणतोय हे पाहून) परंतु त्याआधी आम्ही टीम पांडूने प्री प्रोडक्शनच्या वेळेला केलेल्या कामाची ही छोटीशी झलक. सगळंच खूप सोपं नसतं रावssss