Take a fresh look at your lifestyle.

‘गुड बाय गोवा!’, गायक अवधूत गुप्तेंची बहुचर्चित पोस्ट; शूटिंग थांबवल्या प्रकरणाचा केला खुलासा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने मुंबईत लॉकडाऊनचे आदेश दिले. त्यामुळे मालिकांच्या शुटिंगवर गदा आली असता त्यांनी परराज्यात शूटिंगला सुरुवात केली. दरम्यान सूर नवा ध्यास नवा या मराठी सिंगिंग रिऍलिटी कार्यक्रमाच्या गोव्यातील शूटिंगदरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सेटवर पुरता गोंधळ घालीत शूटिंगला विरोध केला होता. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. त्यामुळे आता गोव्यात सुरू असलेले मालिकांचे शूटिंग पुन्हा बंद झाले आहे. याबात खुलासा करताना सूर नवा ध्यास नवाचे परीक्षक अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर सोबत लिहिले की, गुड बाय गोवा! आठवणी आठवत राहिल्याबद्दल धन्यवाद .. आणि विसरण्यासाठी ! सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथे सुरू होते. पण आता गोव्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे गोव्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाला अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांचा विरोध आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरूवारी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये चित्रीकरण सुरू असताना विजय सरदेसाई यांनी विरोध केला होता. मडगाव आणि फातोर्डा या परिसरात रुग्ण वाढत असताना सेटवर शासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला होता. विजय यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून येथे कोरोनाचे नियम तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचा आरोप टीमवर त्यांनी केला होता.

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका- चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांचे सध्या गोव्यात शूटिंग सुरू होते. मात्र आता या मालिकांचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडणार असल्याचे चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे.