Take a fresh look at your lifestyle.

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा; ‘बलोच’मधील प्रवीण तरडेंचा रांगडा अवतार पाहून चाहते झाले थक्क

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतिहासातील न विसरता येणार क्षण आणि स्वरूप म्हणजे पानिपतचा पराभव. या एका पराभवाने मराठ्यांना बलुचिस्तानात गुलाम व्हावे लागले होते. पानिपत लढाईनंतर उदभवलेले हे भयाण वास्तव ‘बलोच’ या आगामी चित्रपटात त्याच आत्मीयतेने दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांसमोर आले आहे. मराठ्यांच्या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेला हा चित्रपट दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांनी दिग्दर्शित केला असून यात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची थरारक कथा प्रकाश जनार्दन पवार यांच्याच लेखणीतून अवतरली आहे.

बलोचच्या या टिझर पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांचा रांगडा अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अगदी पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात उसळणारी आग आणि निधड्या छातीचा मराठा मावळा, असे हे रूप धारण केलेले प्रवीण तरडे इतिहासाचे एक पान पुन्हा एकदा उलगडणार आहेत. जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या आणि सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यासमोर उभी करणारा हा धगधगता चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

मराठमोळा निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मनोरंजनसृष्टीत कार्यरत असणारे प्रवीण विठ्ठल तरडे यांनी कारकीर्दीच्या सुरूवातीला झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका कुंकू’साठी तब्बल एक हजार भागांचे लिखाण केले होते. ही मालिका चांगलीच हिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या बऱ्याच मालिकांचे लेखन आपल्या दर्जेदार लेखणीतून केले आहे. त्यांनी आज एक अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची अनोखी प्रतिमा निर्माण केली आहे. याआधी शेवटचे ते बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या हिंदी चित्रपटात झळकले होते. त्यानंतर ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘बलोच’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहेत.