Take a fresh look at your lifestyle.

१९व्या पीफसाठी निवड झालेल्या मराठी आगामी चित्रपट ‘कंदील’चे मोशन पोस्टर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका आकर्षक आणि भन्नाट वन लाईनवर आधारलेला नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक वेगळे कथानक आणि वास्तवदर्शी असा ‘कंदील’ हा मराठी चित्रपट सध्या सिनेइंडस्ट्रीमध्ये चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. ”हातात घेऊन सपनाची भिंग निघाले बघाया सशाचे शिंग पोरांना चढली श्रीमंतीची झिंग” या वनलाईनवर हा चित्रपट संपूर्णपणे आधारलेला आहे. हा चित्रपट १९व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) निवडला गेला आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘कंदील’ देश – विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांसाठी देखील उपलब्ध होणार आहे.

एल. के. पिक्चर्स या बॅनरअंतर्गत लक्ष्मण कंद, अभिजीत कंद आणि महेश कंद या निर्मात्यांच्या गटाने या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. याचसोबत त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणा-या गरीबीतील पाच मुलांची हि अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरला कंदीलाची पार्श्वभूमी असून यात पाच तरूण दिसत आहेत. एका झाडाखाली असलेल्या दगडावर तीन तरूण बसलेले आहेत, चौथा तरूण झाडाला टेकून तर पाचवा हाताची घडी घालून जणू भविष्याबाबत गहाण विचार करीत आहे. “श्रीमंत… श्रीमंत…” या गाण्याच्या (मुखडयाची) पार्श्वसंगीताची संगीतमय जोड या मोशन पोस्टरला देण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काहीतरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर वास्तवदर्शी कथानक मनोरंजन शैलीत भाष्य करणार असल्याचे पहायला मिळणार याची खात्री वाटते.

‘कंदील’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणा-या महेश कंद यांचा प्रवास खूप संघर्षमय आहे. त्यांनी कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये यासाठीचे प्रशिक्षण घेतलेले नाही. फिल्म फेस्टिव्हल, फिल्म क्लबमध्ये जाऊन सिनेमाचे तंत्र त्यांनी स्वतःच आत्मसात केले आहे. त्यांनी दिग्दर्शक मिलिंद उके यांच्यासाठी ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी सिनेमासाठी असिस्टंट म्हणून काम केले आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पार्ट टाइम डिप्लोमा इन फोटोग्राफीचा त्यांनी कोर्स केला आहे. ‘कंदील’ची कथा पाहून महेशने हा विषय पडद्यावर कशा पद्धतीने मांडायचा यासाठी तीन वर्ष स्लममध्ये जाऊन रिसर्च केले. विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा आधी मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर प्रत्यक्ष शूटिंगला सुरूवात केली. शूटिंग करतानाही ‘कंदील’च्या टीमला ब-याच समस्यांचा सामना करावा लागला. मात्र यातूनही न डगमगता महेशने नवोदित कलाकार-तंत्रज्ञांचा संच सोबत घेऊन अखेर कंदील पूर्ण केला.

‘कंदील’मध्ये महेश कंद, लक्ष्मण साळुंके, विनोद खुरंगळे, मंदार फाकटकर, दिव्यराज ओव्हाळ, दिलीप अष्टेकर आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. अमरजीत आमले यांनी ‘कंदील’ची पटकथा लिहीली आहे. तर, महेश कंद आणि सुहास मुंडे यांच्या साथीनं त्यांनी गीतलेखन केले आहे. फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले तसेच ‘वळू’ व ‘देऊळ’ चित्रपटांचे संगीतकार मंगेश धाकडे यांनी गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत. तर शाहीर नंदेश उमप, जे. सुबोध आणि चंद्रदीप भास्कर यांनी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. साऊंड मिक्सिंग अनुप देव यांनी केलं असून राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावर यांनी साऊंड डिझाईन केले आहे. यासह सिनेमॅटोग्राफी प्रसाद मोरे यांनी केली आहे. यासोबतच प्रॉडक्शन मॅनेजरची जबाबदारी विनोद खुरंगळे यांनी सांभाळली आहे. निलेश रसाळ आणि दिनेश भालेराव यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे.