Take a fresh look at your lifestyle.

‘कावरा बावरा’, ‘आला मोठ्ठा शहाणा’; ‘पुष्पा’ चित्रपटातील मराठी शब्द संवाद चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर कमालीची कामे करणारा ”पुष्पा- द राईज” हा दाक्षिणात्य चित्रपट नुकताच हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. पुष्पा चित्रपटाची तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त कथानक यामुळे संपूर्ण देशभरात हा चित्रपट पहिला जात आहे. याचे कथानक वेगळे आणि रंजक असल्यामुळे प्रेक्षकांचा अधिक कल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुष्पा निवडक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेचा समावेश आहे. हिंदीत आलेल्या ”पुष्पा” चित्रपटात मात्र मराठी भाषेला जाणीवपूर्वक मानाचं स्थान देण्यात आलं आहे. यातील श्रीवल्लीचा आला मोठ्ठा शहाणा हा डायलॉग चांगलाच चर्चेत आला आहे.

‘पुष्पा – द राईज’ या चित्रपटाच्या हिंदी डबमध्ये मराठी संवादांचा वापर केला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक वर्ग खूप आनंदी आहे. यातील एका सीनमध्ये, ‘चला साहेब’, ‘ये चल रे’ असे मराठी संवाद वापरले आहेत. तर पुष्पाची आई लग्नाची मागणी घालायला येते, तेव्हा पुष्पा ‘चल आई चल’ असं म्हणतो. याशिवाय श्रीविल्लीचा ‘आला मोठ्ठा शहाणा’, कावरा बावरा असे संवाद फारच रंजक वाटत आहेत. त्यामुळे सध्या हे मराठी शब्द संवाद प्रेक्षकांना चित्रपटाकडे आणखीच आकर्षित करत आहेत.

पुष्पा सिनेमातील हे संवाद मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांचा विचार करुन वापरले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. एकंदरीत मराठी पाट्या आणि मराठी शाळा वाचवण्यावर महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत असल्याचे आपण जाणतोच. त्यामुळे आपल्या भाषेला वेगळा दर्जा आहे हे सांगणे किंवा दर्शविणे आपली नैतिक जबाबदारी आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्ग हा मराठी भाषिक असल्यामुळे पुष्पा चित्रपटातील मराठी भाषेतील शब्दांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव दिसून येत आहे. याशिवाय पुष्पा चित्रपटातील मुख्य नायक अल्लू अर्जुनसाठी मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. तसेच अल्लू अर्जुन याने पहिली पत्रकार परिषद घेताना, सर्वांना माझा नमस्कार. मी मद्रासी असल्याने मला इतर भाषा बोलताना उच्चार ठळक येत नाहीत, म्हणून सांभाळून घ्या असं म्हटलं होतं.