Take a fresh look at your lifestyle.

लोकशाहीर काशिराम चिंचय यांचे निधन; 71’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पारंपारिक कोळी गीतांचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी मिळत आहे. शनिवारी १५ जानेवारी २०२२च्या पहाटेच्या सुमारास त्यांचे अल्पश्या आजाराने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान काशिराम चिंचय यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ते ७१ वर्षांचे होते.

लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात्त पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित मुली आहेत. वृत्तानुसार, काशीराम लक्ष्मण चिंचय गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. यासाठी ते अंधेरी येथील ‘ब्रह्मकुमारी’ रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. गेल्या ५ दशकांहून अधिक काळ चिंचय हे कोळी-आगरी समाजातील पारंपरिक गीते सातासमुद्रापार घेऊन गेले आहेत. चिंचय याना चित्रपटसृष्टीतदेखील मोठी ओळख आहे. त्यांनी रचलेली आणि गायलेली कोळीगीते चांगलीच गाजली आहेत.

 

चिंचय यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक कोळीगीते गायली. यात ‘डोल डोलतंय वाऱ्यावर’, ‘डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला’, ‘वेसावची पारू’, ‘हिच काय गो गोरी गोरी’ अशा अनेक गीतांचा समावेश आहे. ‘वेसावकर आणि मंडळी’ या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे व्हीनस म्युझिक कंपनीच्या वतीने निर्मिती केलेले त्यांचे अनेक संगीत अल्बम चांगलेच गाजले आहेत. यामुळे काशिराम चिंचय यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चिंचय यांच्या निधनाने आगरी-कोळी समाजावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी लोकसंगीतात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशी शोकाकुल भावना व्यक्त केली आहे.