Take a fresh look at your lifestyle.

‘मी वसंतराव’ एका प्रतिभावान व्यक्तिमत्वाची प्रभावशाली कथा; दिग्दर्शकाने व्यक्त केल्या भावना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या ५२’व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात चित्रपट श्रेणीमध्ये सादर होत असलेला ‘मी वसंतराव’ हा चित्रपट अभिजात संगीतातील महान कलाकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अवलिया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या घडणीचा प्रवास दाखवितो. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

निपुण धर्माधिकारी हे मराठी लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. संगीत नाटकांना पुनरुज्जीवन आणि पाच अंकी नाटकांची निर्मिती यासाठी ते प्रसिध्द आहेत. ते म्हणाले, या चित्रपटात भिन्न भिन्न प्रेक्षकांना भावण्याची क्षमता आहे. ‘चित्रपटाची कथा व्यक्तिगतरित्या वसंतराव देशपांडे यांची असली तरीही त्यामध्ये कलाकार होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सार्वत्रिक ओढ आहे.’ जगभरातील चित्रपटांमधून संपूर्ण लांबीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या सुवर्ण मयूर पारितोषिकासाठीच्या स्पर्धेत असलेला हा चित्रपट, प्रख्यात होण्याआधी वसंतरावांच्या जीवनात काय घडले याचे वर्णन करतो.

महाराष्ट्रात, विदर्भातील एका खेड्यात जन्मलेल्या आणि नंतर नागपूर येथे त्यांच्या आईकडून एकहाती जोपासना झालेल्या वसंतरावांचे जीवन म्हणजे त्यांच्या आयुष्याला आणि संगीत साधनेला आकार देणाऱ्या उत्कंठावर्धक घटनांचा कॅनव्हास आहे. त्यांचे जीवन घडविणाऱ्या घटनांमध्ये या महान कलाकाराची पु.ल.देशपांडे आणि बेगम अख्तर यांच्या अनोख्या मैत्रीचा, भारतीय सैन्यातील नोकरी, लाहोरमध्ये घेतलेले संगीत शिक्षण, १९६२च्या युद्धात भारत-चीन सीमेवर त्यांची झालेली नेमणूक आणि त्यांना मोठी ख्याती मिळवून देणारी कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकात केलेली भूमिका यांचा समावेश आहे.

‘मी वसंतराव’ यामध्ये वसंतरावांची भूमिका त्यांचे नातू आणि प्रमुख समकालीन शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी भूषविली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना, दिग्दर्शक म्हणाले, ‘राहुल देशपांडे यांच्यासोबत मी काम केले आहे आणि आम्ही एकत्रपणे संगीत नाटकांना पुनरुज्जीवित केले. व्यावसायिक अभिनेता नसूनही त्यांनी ही भूमिका अत्यंत समर्थपणे केली आहे.’ वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालिकडचे असल्यामुळे या चित्रपटाची कथा तयार करण्यास दोन वर्षे लागली असे धर्माधिकारी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.