Take a fresh look at your lifestyle.

मीना नाईक यांच्या ‘अभया’ची शतकपूर्ती; बाल लैंगिक शोषणावर भाष्य करणारे एकपात्री नाट्य

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाल लैंगिक शोषण… केवळ हे तीन शब्द देखील अनेकांच्या चेहऱ्यावरील रंग बदलतात. याचे कारण म्हणजे हा असा गंभीर विषय आहे ज्याबाबत बोलणे सर्रास टाळले जाते. पण याच विषयावर भाष्य करणाऱ्या आणि पोक्सो कायद्याबाबत जनजागृती करणाऱ्या मीना नाईक यांच्या ‘अभया’ या एकपात्री नाट्याने अलीकडेच शंभर प्रयोग पूर्ण केले आहे. आतापर्यंत अनेक शाळांमध्ये या एकपात्री ‘अभया’ नाटिकेचे प्रयोग झाले आहेत. यानिमित्ताने हजारो मुलामुलींनी आणि पालकांनी सहभाग घेत यावर मत प्रकट केले आहे. न कळत्या वयातही लहान मुलींवर अत्याचार होतात आणि अशी प्रकरणे भीतीपोटी दाबली जातात. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होत नाहीच उलट ही मनोवृत्ती बळावते. परिणामी पुढे आणखी मुलींना हाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुलींनी धीटपणे अत्याचाराबाबत माहिती देऊन आरोपीला शिक्षा घडवून आणणे गरजेचे आहे. अशी जनजागृती हि ‘अभया’ करते.

या नाटिकेतील पीडित्याच्या भूमिकेत चिन्मय स्वामी आहे. यातील अभयाने दिलेला लढा, तिला आईची मिळालेली साथ, पोलीस प्रशासन, रुग्णालय, स्वयंसेवी संस्था यांनी अभयाला नवं जीवन दिलंय. अभयाची हि निर्भय कहाणी हि नाटिका सांगते. बाल लैंगिक शोषणविरोधी पोक्सो कायद्याची माहिती या नाटकातून दिली आहे. आतापर्यंत अनेक शाळांमध्ये याचे प्रयोग झाले असून मीना नाईक स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. शिवाय या संवादातून मीना नाईक सांगतात कि, कोणत्याही अत्याचाराला बळी पडल्यास मुलींनी घाबरू नये. तसेच कुटुंबातूनही अत्याचार झाल्याच्या घटना उघड होऊ शकतात. फक्त अत्याचार झाल्यास मुलींनी न घाबरता आपल्या विश्वासातील माणसांना याची माहिती द्यावी, असे आवाहन करतात.

 

‘अभया’चा १०० वा प्रयोग महिला दिनानिमित्त आयोजित महोत्सवात झाला. या प्रयोगाला सचिन खेडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यानचा किस्सा सांगताना मीना नाईक म्हणाल्या, ‘अभया’चा प्रयोग अर्धा झाला असताना रवींद्र नाट्य मंदिरातले लाईट्स गेले. अजून तासभर तरी वीज नसेल असं सांगण्यात आलं. प्रेक्षकांना नाटिका बघायची होती. प्रेक्षकांनी ठरवलं की मोबाईल फ्लॅश लाईट्स सुरू करायचे. नाटक पूर्ववत सुरू झाले आणि पाचव्या मिनिटाला लाईट्स आले. प्रकाशयोजना पूर्ववत झाली आणि प्रेक्षकांनी हळूवारपणे आपले मोबाईल बंद केले. नाटक तेवढ्याच भावनिक तीव्रतेने चालू होतं. प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू होते. ‘अभया’ची लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची धडपड, तगमग, फरफट प्रेक्षकांना अस्वस्थ करणारी होती. पण शेवटी पोक्सो कायद्यामुळे तिला न्याय मिळतो, हे पाहणं सुखावह होतं.