हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे अलीकडेच आपल्याला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसली होती. या पर्वात एक वेगळीच मेघा सर्वांनी पाहिली. मेघ जितकी लावणी झणझणीत करते तितकाच तिचा स्वभावही तिखट आहे हे आपण पाहिलं. यानंतर नुकतीच तिची एक नवी लावणी रिलीज झाली आहे. ‘अहो पाव्हनं …’ असे या लावणीचे शीर्षक आहे. कमालीची नजाकत आणि अस्सल लावणीचा आनंद या लावणीतून मिळत आहे. म्हणूनच रसिकांनी देखील या लावणीला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
मेघ घाडगेच्या या नव्या लावणीचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकने आणला आहे. मोठ्या गॅपनंतर मेघा घाडगेच्या नव्या आणि अस्सल लावणीचा स्वाद संगीतप्रेमींना घेता आला आहे. ज्यामुळे अगदी दोनचं दिवसात या लावणीने 100K व्ह्यूजचा पल्ला पार केला आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री मेघा घाडगेसोबत अभिनेता संजय खापरे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. दोन दिवसांत मिळालेला प्रतिसाद पाहून मेघा घाडगेने एक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये मेघाने लिहिले आहे कि, ‘अहो पाव्हनं जरा वाढवू प्रेमाची गोडी… प्रेमाची गोडी इतकी वाढली की दोन दिवसांतच ‘अहो पाव्हनं’ लावणीला मिळाले #100K पेक्षा जास्त व्ह्यूज.. मायबाप प्रेक्षकहो, तुमचे मनापासून आभार!!’. या लावणीचे बोल योगेश पाटील यांचे आहेत. तर प्रवीण डोणे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे आणि प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडेने आपला सुरेल आवाज या लावणीला दिला आहे.
मेघा घाडगेने स्वतः या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन केले असून नृत्य दिग्दर्शक म्हणून अविनाश पायाळ यांनी जबाबदारी उत्तम पेलली आहे. तसेच सुरेश देशमाने यांनी छायाचित्रण केले आहे आणि जयेंद्र भांडे यांनी या गाण्याचे संगीत संयोजन केले आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून याचे काम पाहिले आहे.
Discussion about this post