Take a fresh look at your lifestyle.

मनोरंजनासाठी व्हा तय्यार.. कारण येत आहे ‘मी होणार सुपरस्टार’; नव्या पर्वाचा होणार श्री गणेशा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मी होणार सुपरस्टार… आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या शोच्या आगामी नव्या कोऱ्या पर्वाची शेवटचे ऑडिशन चालू आहेत. यामध्ये जे बाजी मारतील ते शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या नव्या शोमध्ये अगदी ४ वर्षाच्या लहानग्यांपासून ते ७० वयोगटातील ज्येष्ठांपर्यंत सगळेच स्पर्धक आपलं टॅलेंट जगासमोर दाखवण्यास सज्ज झाले आहेत. या शोसाठी कवी, गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी, गायिका बेला शेंडे, गायक आदर्श शिंदे हे परिक्षक म्हणून लाभले आहेत. तर महाराष्ट्राचा लाडका अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची सूत्र सांभाळणार आहे. मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा येत्या १४ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राभरातून ७१ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या ७१ जणांमधून २६ स्पर्धक हे मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले आहेत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राने व्हायचंय तय्यार कारण मनोरंजन घेऊन येत आहे मी होणार सुपरस्टारर..

या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना परीक्षक आणि तरुणाईला वेड लावणारा गायक आदर्श शिंदे म्हणाला कि, ‘मला सगळ्यात जास्त कौतुकाचं हे वाटतं की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचं म्युझिक ऐकायला मिळतं. महाराष्ट्रातले संगीतप्रेमी या सगळ्या संगीताचं फ्युजन करुन काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अश्याच हटके प्रयत्नांना स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमातून हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. काळाप्रमाणे संगीत ही समृद्ध होत जातंय. ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचाच्या मंचावरचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. यावेळी तर ४ ते ७० वयोगटातील स्पर्धक आणि सोबत मनाला भावणारी गाणी लाईव्ह ऐकायला मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं लोकसंगीत बीट बॉक्सर्स, रॅपर्स, बँकिंग व्होकल्स, ग्रुप सिंगिंग, सोलो, ड्युएट, हार्मनिज हे सगळं एका मंचावर ऐकायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजवर माझ्या गुरुजनांकडून मी जे शिकलो ते सारं काही या स्पर्धकांसोबत शेअर करणार आहे.

याशिवाय सुमधुर गायिका आणि शोच्या परीक्षक बेला शेंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात कि, ‘हे पर्व स्पर्धकांपेक्षा परिक्षकांसाठी अवघड जाणार आहे. कारण ४ ते ७० असा वयोगट आहे. यामुळे प्रेक्षकांना अवघड जाणार की, यातला बेस्ट स्पर्धक कसा निवडणार..? मला वाटतं वयाचं बंधन कश्यालाचा नसतं. हवं असतं ते पॅशन त्यामुळे गाणं मग ते कोणत्याही वयोगटातील स्पर्धकाने गायलं तरी ते तुम्हाला निखळ आनंद देतं. मी होणार सुपरस्टार आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम म्हणजे नुसती स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणार सोहळाच आहे.

यासह संगीतकार आणि गायक तसेच शोसाठी परीक्षक म्हणून लाभलेले सलील कुलकर्णी म्हणाले कि, ‘स्टार प्रवाह वाहिनीचे आभार की त्यांनी अत्यंत आगळं वेगळं पर्व मला जज करण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातून आलेल्या स्पर्धकांना हा मंच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देतोय. गाण्याचे वेगवगळे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत आणि हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे.