Take a fresh look at your lifestyle.

मनोरंजन विश्वावर शोककळा; मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघेंची कॅन्सरशी लढत अपयशी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील लोकप्रिय अभिनेते आणि अत्यंत प्रसिद्ध असे मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे रविवारी निधन झाले. दरम्यान त्यांचे वय ६८ होते. माधव मोघे हे थर्ड स्टेज कॅन्सरशी गेल्या अनेक काळापासून लढत होते. मात्र अखेर त्यांची कॅन्सरशी सुरु असलेली लढत अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेते माधव मोघे यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांची मुलगी प्राची मोघे यांनी दुजोरा दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना माधव मोघे यांची मुलगी प्राची मोघे यांनी सांगितले कि, ‘गेल्या काही दिवसांपासून वडिलांची प्रकृती अत्यंत खालावली होती. दरम्यान उपचारार्थ त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. कालच आम्ही त्यांना रुग्णालयातून घरी आणले आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’ माधव मोघे यांनी दामिनी, घातक, विनाशक, पार्टनर अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले होते. विशेषत: ‘शोले’ या चित्रपटातील ठाकूरची मिमिक्री करुन त्यांनी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रियता मिळवली. छोट्या पडद्यावरच्या अनेक कॉमेडी शोमध्येही त्यांनी प्रेक्षकांना अगदी पोट दुखेपर्यंत हसवले.

 

‘दामिनी’ या चित्रपटातून १९९३ साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या त्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. पुढे एमटीव्ही वाहिनीवर ‘फुल्ली फालतू’ नावाच्या शोमध्ये त्यांनी ‘शोले’च्या ठाकूरचे पात्र चांगलेच उमटविले होते. ठाकूरची मिमिक्री ते इतकी हुबेहूब करत होते की, त्यांना दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाऊ लागले होते. इतकेच काय तर उत्पल दत्त आणि राज कुमार यांचीदेखील मिमिक्री ते हुबेहूब करत होते. यामुळे देशविदेशात त्यांचे मिमिक्रीचे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होते. गतवर्षी २१ जूनला माधव यांच्या पत्नीचे निधन झाले होते. तेव्हा त्या किडणीच्या आजाराने ग्रस्त होत्या. यानंतर आज कॅन्सरमुळे मिमिक्रीच्या बादशाहला देखील देवाज्ञा झाली.