Take a fresh look at your lifestyle.

माझ्या जीवाला धोका आहे; गायिका वैशाली भैसने- माडेचा फेसबुक पोस्टमधून मोठा दावा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सारेगमप या हिंदी आणि मराठी सिंगिंग रिऍलिटी शो ची विजेती गायिका वैशाली भैसने माडे हिने आपल्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. वैशालीने आपल्या अधिकृत फेसबुक हॅण्डलवरून पोस्ट करत याची माहिती दिली आहे. वैशालीच्या या पोस्टमुळे एकंदरच कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने आपल्या चाहत्यांना मला तुमच्या स्पोर्टची गरज आहे असे आवाहन केले आहे. शिवाय येत्या २ दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याचीही माहिती दिली आहे.

सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे हिने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून हि खळबळजनक पोस्ट केली आहे. हि पोस्ट करताना वैशाली भैसने माडे हिने लिहिले कि, काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. २ दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. वैशालीने नेहमीच आपल्या गोड गळ्याने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. तिच्या गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे तिचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. वैशालीची हि पोस्ट पाहून तिचे चाहते अत्यंत काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी तुम्ही काळजी घ्या ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गायिका वैशाली भैसने माडे हि सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय दिसते. त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्यातील चांगल्या वाईट क्षणांमध्ये ती नेहमीच आपल्या चाहत्यांना सामावून घेत असते. त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे हे सांगण्यासाठी तिने सोशल मीडियाचा पर्याय निवडला. सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोचे विजेतेपद पटकावणारी वैशाली २००९ साली हिंदी सारेगमपचेदेखील विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली होती. पुढे सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या शोमध्ये ती झळकली होती. आतापर्यंत तिने अनेक लोकप्रिय गाणी गेली आहेत. इतकेच नव्हे तर कुलवधू, होणार सून मी ह्या घरची, माझ्या नवऱ्याची बायको यासारख्या लोकप्रिय मराठी मालिकांची शीर्षकगीतेदेखील तिने गायली आहेत. अलीकडेच तिने राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे.