Take a fresh look at your lifestyle.

‘मी येडा आहे.. मी काहीही म्हणेन’; नागराज मंजुळेंकडून माध्यमांची कानउघाडणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात भोंग्याच्या वादाने काही वेगळेच रूप घेतल्याचे दिसून येत आहे. काही राजकीय पक्षांच्या परखड भूमिकेमुळे जनतेतील सर्वसामान्य वातावरण अचानक पेटून उठले आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे २०२२ रोजी सभेत मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात अल्टिमेटम दिला. यासाठी राज्य सरकारने मात्र प्रखर विरोध केल्यानंतर हे प्रकरण चिघळताना दिसू लागले आहे. कारण याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी भोंगा चर्चेचा विषय झालाय. दरम्यान सामाजिक प्रबोधन करणाऱ्या विषयांवर चित्रपट बनविणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना माध्यमांनी भोंग्यांच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना मिश्किल स्वरूपात मंजुळेंनी माध्यमांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्या प्रतिभेतून विविध सामाजिक विषयांना हात घालत समाज प्रबोधन करण्या हेतू चित्रपट निर्मिती करताना दिसतात. यामुळे पुणे श्रमिक मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांना भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी विचारणा करण्यात आली. या विषयावर स्पष्ट भूमिका व्यक्त करत नागराज मंजुळे म्हणाले कि, “माझ्या उत्तराने काय होणार आहे? माझी मतं मी अनेक वेळा मांडतो. प्रेम हाच जगण्याचा मार्ग आहे. एकमेकांवर प्रेम करत रहावं. पण मी असं म्हटल्यावर देखील आपली भांडणं होतच राहणार आहेत. तसेच यावेळी बोलताना नागराज मंजुळे यांनी मिश्किल टिप्पणी करीत माध्यमांना कमी शब्दांत चांगलेच सुनावले.

 

मंजुळे म्हणाले कि, “एक काळ होता जेव्हा बाबासाहेब लिहायचे, टिळक लिहायचे, आगरकर लिहायचे. त्यातून काहीतरी दिशा मिळायची. पण आता तुम्ही माझ्यासारख्याला विचारता आणि तेच मत हेडलाईन म्हणून छापता. मी येडा आहे. मी काहीही म्हणेन. माझं मत कशाला छापता तुम्ही? जे समंजस आहेत, जे बुजुर्ग माणसं आहेत, दिशादर्शक माणसं आहेत, त्या लोकांची मतं हेडलाईन म्हणून छापा ना. मी समाजातील खूप छोटा माणुस आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे काहीच होणार नाही. त्यात मला सोशल मीडियाची फार भिती वाटते. मी काहीतरी फेसबुकवर लिहिले की, तुम्ही त्याचीसुद्धा हेडलाईन करता. म्हणून मी एवढंच सांगेन की प्रेमानं रहायला पाहिजे. आपल्यात फरक राहणारच. माणसं काय लगेच एकसारखी होत नाही. पण जितक्या सह्रदयतेने प्रत्येकाशी वागता येईल, तितकं आपण वागायचं”.